या प्रवासाने मला निसर्गसौंदर्याबरोबरच काही वास्तवही दाखवले. सुंदर रस्त्यांवरही जबाबदारीची गरज आहे, हे शिकवले. पूल, चर्च, हिरवी शेते, पक्षी, बुद्धाचा पुतळा, डोंगर, अरुंद रस्ते, ट्रक आणि रेल्वे रुळ, या सगळ्यांनी मिळून गोव्याच्या अंतरंगाचं एक वास्तववादी चित्र उभं केले आहे.

काही प्रवास फार लांबवरचे नसतात, पण मनावर खोल ठसा उमटवतात. सावर्डेहून चांदर, पारोडा आणि सर्जोरामार्गे करमणे - सासष्टीला जाणारा माझा प्रवास असाच एक अनुभव होता. अंतराने तो छोटा होता, पण निसर्ग, शांतता आणि आत्मचिंतनाने भरलेला होता. या प्रवासाने मला गोव्याचे एक वेगळे, शांत आणि आत्मीय रूप दाखवले, जे गर्दीच्या रस्त्यांपासून दूर आहे.
सावर्डेहून प्रवास सुरू करताच आजूबाजूचे वातावरण हळूहळू बदलू लागते. गोंगाट कमी होतो, रस्ते शांत होतात आणि हिरवळ अधिक दाट होत जाते. वाटेत येणाऱ्या लहान पुलांवरून जाताना मी नकळत वेग कमी करते. खाली वाहणारे शांत पाणी, आजूबाजूला ऐकू येणारे पक्ष्यांचे आवाज आणि झाडांची सावली मनाला खूप प्रसन्न करते. अशा साध्या क्षणांतच खरी शांतता सापडते, हे पुन्हा एकदा जाणवते.
चांदर गावात पोहोचल्यावर प्रवासाला ऐतिहासिक स्पर्श मिळतो. हिरवळीच्या पार्श्वभूमीवर उभं असलेलं चांदर चर्च अत्यंत शांत आणि प्रभावी वाटतं. काही काळ तिथे थांबून परिसर पाहताना एक वेगळाच स्थैर्याचा अनुभव येतो. कधीकाळी राजधानी असलेले चांदर आजही आपल्या मातीत इतिहास जपून ठेवून आहे. गावातील अरुंद रस्त्यांतून जाताना भूतकाळ आणि वर्तमान एकत्र नांदताना दिसतात.
चांदरच्या पुढे गेल्यावर मी परोडा गावात प्रवेश करते. इथे दृश्य पूर्णपणे खुलं होतं. दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवीगार शेती, त्यावरून उडणारे पक्षी आणि मोकळं आकाश पाहून मन भरून येते. या शेतांच्या मधोमध उभा असलेला बुद्धाचा पुतळा विशेष शांतता देतो. तो जणू या परिसराचा मूक रक्षक वाटतो. त्या ठिकाणी थांबून काही क्षण घालवताना मन नकळत शांत होते.आणि प्रवासाचा खरा अर्थ उमगतो.
परोड्यानंतर सार्जोराकडे जाणारा रस्ता अरुंद आणि वळणावळणाचा होतो. हा डोंगराळ रस्ता अतिशय सुंदर असला तरी इथे एक वेगळीच समस्या जाणवते. या अरुंद रस्त्यावरून अनेक मोठे ट्रक जाताना दिसतात. समोरून ट्रक आल्यावर अनेकदा थांबावे लागते किंवा रस्त्याच्या कडेला वाहन घ्यावे लागते. काही ठिकाणी तर रस्ता इतका अरुंद असतो की अपघाताची भीती वाटते.
या ट्रक चालकांपैकी अनेकजण मोबाईल फोनवर बोलत वाहन चालवताना दिसतात. हे दृश्य मनात अस्वस्थता निर्माण करते. इतक्या निसर्गरम्य आणि शांत भागात अशी बेफिकीर वाहनचालना धोकादायक वाटते. हिरवळीच्या मधून जाणारा हा सुंदर रस्ता क्षणात तणावपूर्ण होतो. निसर्गाच्या सान्निध्यात माणसाची निष्काळजी वृत्ती प्रकर्षाने जाणवते.
तरीही, सर्जोरामध्ये पोहोचल्यावर पुन्हा एकदा मन शांत होते. रेल्वे रुळ हिरवळीच्या मधून जाताना दिसतात. ट्रेन दिसो वा न दिसो, हे रुळ सतत हालचालीची आणि जोडणीची जाणीव करून देतात. कितीतरी प्रवास, कथा आणि अनुभव या रुळांवरून वाहत असतील, असा विचार मनात येतो.
प्रवासाचा शेवट करमणे येथे होत असताना समाधानाची भावना मनात दाटून येते. या प्रवासाने मला निसर्गसौंदर्याबरोबरच काही वास्तवही दाखवले. सुंदर रस्त्यांवरही जबाबदारीची गरज आहे, हे शिकवले. पूल, चर्च, हिरवी शेते, पक्षी, बुद्धाचा पुतळा, डोंगर, अरुंद रस्ते, ट्रक आणि रेल्वे रुळ, या सगळ्यांनी मिळून गोव्याच्या अंतरंगाचं एक वास्तववादी चित्र उभं केले आहे.
हा प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नव्हता, तर निसर्ग, माणूस आणि त्यांच्या सहअस्तित्वाचा अनुभव देणारा होता.

- डॉ. सुजाता दाबोळकर