बाळाच्या आयुष्यातील पहिला आठवडा आई-बाळासाठी अतिशय महत्त्वाचा काळ

बाळ जन्मानंतरचा पहिला आठवडा आई आणि बाळासाठी बदलांचा व नाजूक असतो. स्तनपान, बाळाचे आरोग्य आणि डॉक्टरांचा सल्ला याविषयी योग्य माहिती घेऊन हा प्रवास सुखकर कसा करावा?

Story: अाईपण भारी देवा ! |
23rd January, 09:22 pm
बाळाच्या आयुष्यातील पहिला आठवडा  आई-बाळासाठी अतिशय महत्त्वाचा काळ

बाळ जन्मल्यानंतरचा पहिला आठवडा हा आई आणि बाळ दोघांसाठीही खूप नाजूक, शिकण्याचा आणि जुळवून घेण्याचा काळ असतो. या काही दिवसांत योग्य काळजी, योग्य माहिती आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला मिळाल्यास पुढील बाळंतपणाचा प्रवास खूप सोपा होतो.

स्तनपानाचे महत्त्व

बाळासाठी आईचे दूध हे पहिले आणि सर्वोत्तम अन्न आहे. जन्मानंतर पहिल्या काही दिवसांत येणारे पिवळसर घट्ट दूध (कोलोस्ट्रम) बाळाच्या प्रतिकारशक्तीसाठी फार महत्त्वाचे असते. हे दूध बाळाला जंतुसंसर्गापासून संरक्षण देते, पचनसंस्थेला चालना देते आणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटक पुरवते. पहिल्या ६ महिन्यांत बाळाला फक्त आईचे दूधच पुरेसे असते – पाणीही वेगळे देण्याची गरज नसते.

योग्य पद्धतीने स्तनपान कसे करावे?

स्तनपान करताना बाळाचे तोंड स्तनाच्या एरिओलासह (निप्पलभोवतीचा काळा भाग) व्यवस्थित धरले गेले पाहिजे. बाळाचे पोट आईच्या पोटाला लागलेले असावे, मान व शरीर सरळ रेषेत असावे. स्तनपान करताना आई आरामदायक स्थितीत बसलेली किंवा झोपलेली असावी. दर २–३ तासांनी किंवा बाळ मागणी करेल तेव्हा दूध द्यावे.

अडचणी आल्यास मदत घ्या.

  • पहिल्या आठवड्यात अनेक मातांना स्तनपान करताना अडचणी येऊ शकतात –
  •  निप्पलला जखमा किंवा क्रॅक पडणे  स्तनात वेदना किंवा सूज 
  •  बाळ नीट दूध न शोषणे  स्तनपान करताना अस्वस्थ वाटणे

या अडचणी सामान्य आहेत, पण दुर्लक्ष करू नये. अशावेळी लगेच पेडियाट्रिशियन किंवा लॅक्टेशन काउन्सेलर यांची मदत घ्यावी. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या समस्या सहज सुटतात आणि स्तनपान सुरू ठेवता येते.

बाळाची शी-सू-सू (पॉटी-युरिन) पॅटर्न

  •  पहिल्या काही दिवसांत बाळ लघवी कमी करू शकते, पण दिवसेंदिवस लघवीची संख्या वाढते.
  •  तिसऱ्या-चौथ्या दिवसानंतर दिवसाला किमान ५–६ वेळा लघवी होणे अपेक्षित आहे.
  •  पहिल्या दोन दिवसांत काळपट चिकट शी (मेकोनियम) येते, नंतर हळूहळू पिवळसर सैल शी होते.
  • हा बदल पुरेशा स्तनपानाचे लक्षण आहे.

पुरेसे स्तनपान म्हणजे काय?

बाळ शांत झोपते, वजन हळूहळू वाढते, लघवी-शी योग्य प्रमाणात होते आणि स्तनपानानंतर समाधान दिसते – ही पुरेशा स्तनपानाची चिन्हे आहेत. फक्त रडणे म्हणजे दूध कमी आहे असे नेहमीच नसते.

पहिल्या आठवड्यात पेडियाट्रिशियनला भेट का आवश्यक?

जन्मानंतर पहिल्या ५–७ दिवसांत बाळाला पेडियाट्रिशियनकडे नेणे फार महत्त्वाचे आहे. या भेटीत बाळाचे वजन, पिवळ्या काविळीची तपासणी, स्तनपानाची योग्य पद्धत तपासणे, आई-बाळ दोघांच्या शंका दूर करणे हे सर्व केले जाते. ही भेट पुढील आरोग्याचा मजबूत पाया घालते.

लक्षात ठेवा – पहिला आठवडा योग्य मार्गदर्शनात गेला, तर आई-बाळाचा संपूर्ण प्रवास अधिक सुखकर होतो. मदत मागण्यात अजिबात संकोच करू नका.


- डॉ. पूनम संभाजी

बालरोगतज्ज्ञ