पणजी बस स्टँडवरचा राजबिंडा आणि लाघवी पायलट 'फ्रेडी' एकाएकी मेंटल हॉस्पिटलमध्ये कसा पोहोचला? प्रामाणिकपणा आणि परिस्थितीच्या संघर्षात भरडलेल्या एका साध्या माणसाची ही हृदयद्रावक कथा.

माझी मुलगी 'सोशल वर्क'मध्ये मास्टर्स करत होती. तिला विद्यापीठातून अनेक ठिकाणी ट्रेनिंगला जावे लागे. एकदा ती एका प्रोजेक्टसाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये गेली होती. नेहमीप्रमाणे संध्याकाळी घरी आली आणि म्हणाली, "आई, आज मला जे पेशंट स्टडी करायला दिले होते, त्यातील एकजण हुबेहूब फ्रेडी अंकलसारखा दिसत होता. मी त्याला नावही विचारले, पण त्याला काही कळत नव्हते. त्याने मला ओळखले नाही, पण तो फ्रेडी अंकलच होता हे नक्की."
हे ऐकून मी चकित झाले. फ्रेडी! आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये? मन मान्यच करेना. दिवसभर मी बेचैन होते. राहवेना म्हणून दुसऱ्या दिवशी लेकीबरोबर तिथे गेले. खरे तर तिथे नातेवाईकांशिवाय इतरांना प्रवेश नसतो, पण मुलीच्या ओळखीने मी आत गेले. तिने लांबूनच बोट दाखवले, "बघ, कोण तो!" मी नीट पाहिले, होय तो फ्रेडीच होता. तो मला ओळखू शकला नाही, पण मी मात्र त्याच्या चालण्याच्या विशिष्ट लकबीवरून त्याला ओळखले. पूर्ण काळवंडलेला चेहरा, खुरटी दाढी, अंगावर हॉस्पिटलचे कपडे... तो अगदी वेगळाच वाटत होता. एका जमान्यात राजबिंडा म्हणता येईल असा गोरा, उंच आणि प्रेमळ फ्रेडी आज या परिस्थितीत?
मनाची कॅसेट अचानक 'रिवाईंड' झाली आणि मी २०-२५ वर्षे मागे पोहोचले. पणजी माझे आवडते शहर. एज्युकेशन डिपार्टमेंट किंवा कला अकादमीचे काम आले की मी तिथे धावत असे. दोन्ही ठिकाणे बस स्टँडपासून लांब, त्यामुळे रिक्षा किंवा 'पायलट' आलीच. त्या सुमारास आमची फ्रेडीशी ओळख झाली. फ्रेडरिक डिसोझा त्याचे नाव. काही लोक त्याला 'पाखलो फ्रेडी' सुद्धा म्हणत. दिसायला अतिशय गोरा असा हा फ्रेडी स्टँडवर पायलट चालवायचा. माणूस फार लाघवी! मग्रुरी किंवा भाड्यात दगाबाजी त्याच्या स्वभावातच नव्हती. समोर भेटला की मोठ्याने हसून विचारणार, "खंय वचपाचे मॅडम? कला अकादमी की एज्युकेशन डिपार्टमेंट?"
लवकरच आमची दोस्ती जमली. एकदा कला अकादमीत चहा पिताना मी त्याची माहिती काढली. ताळगाव भागात एका छोट्या घरात तो आपल्या आई आणि पत्नीसोबत राहत असे. त्याचे वडील पोर्तुगीज सैनिक होते, जे स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याला आणि त्याच्या आईला उघड्यावर टाकून निघून गेले होते. समाजाचे टोमणे ऐकत फ्रेडी मोठा झाला. तो आपल्या गिऱ्हाइकांशी कमालीचा प्रामाणिक असे. "जिझसाक माका जाप दिवची पडतली" (मला येशूला उत्तर द्यावे लागेल), असे तो नेहमी म्हणायचा.
दुर्दैवाने, फ्रेडीचा संसार सुखाचा झाला नाही. त्याची पत्नी अतिशय भांडखोर आणि खर्चिक होती. घरात पत्नीच्या शिव्या आणि बाहेर 'पाखलो' म्हणून मिळणारे टोमणे, यातच त्याचे आयुष्य गेले. हळूहळू तो स्टँडवर दिसेनासा झाला. एकदा तो दोना पावलला मासेमारी करताना भेटला, पण त्याच्या हसण्यात पूर्वीची चमक नव्हती.
त्यानंतर विस्मृतीत गेलेला फ्रेडी थेट अशा अवस्थेत मुलीला भेटला. वॉर्डनने भेटायची वेळ संपल्याचे सांगितले आणि मी तिथून निघाले, पण डोक्यात फ्रेडीचेच विचार होते. काय चुकले त्याचे? एक भोळा, पापभिरू आणि प्रामाणिक माणूस... नियतीने त्याला एवढी मोठी शिक्षा का दिली?

- रेशम जयंत झारापकर
मडगाव, गोवा.