आपलं आयुष्य अपेक्षेपेक्षा वेगळं निघालंय, याचा अर्थ ते चुकलेलं आहे असा नाही. मुळात आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही.

आपलं आयुष्य अपेक्षेपेक्षा वेगळं निघालंय का?”
आपल्यापैकी कित्येकांना कधी कधी शांत क्षणी मनात एक विचार डोकावला असेल.. “मला तर वाटलं होतं माझं आयुष्य असं असेल, अमुक अमुक आपण मिळवू वगैरे...”
पण तसं काही झालंच नाही.
बाहेरून सगळं ठीकठाक दिसतं. नोकरी आहे, कुटुंब आहे, जबाबदाऱ्या निभावत आहोत. तरीही आत कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, किंवा एक हलकी, पण सतत जाणवणारी खंत वाटत राहते, अशी खंत जी अनेकदा अपेक्षांशी विसंगत झालेल्या आपल्याच आयुष्याची एक शांत जाणीव भासते.
आता ह्या अपेक्षा आपण एकट्याने तयार करत नसतो तर त्या लहानपणापासून हळूहळू घडत जातात. बालपणी पाहिलेली स्वप्नं, घरच्यांच्या अपेक्षा, कौटुंबिक जबाबदाऱ्या, शिक्षण काय शिकवतं व समाजाने ठरवलेल्या यश, स्थैर्य, सुख याच्या ठरावीक व्याख्या अथवा चौकटी..या सगळ्यांतून नकळत आपल्या मनात आपल्या आयुष्याचा एक आराखडा तयार होतो. मी असं करेन, तसं मिळवेन, तिथे पोहोचेन, मग माझं आयुष्य सार्थकी लागेल अशी एक कल्पना मनात बसते.
परंतू दुर्दैव म्हणा किंवा सुदैव, आपलं आयुष्य सरळ रेषेत कधीच चालत नाही. निर्णय, परिस्थिती, जबाबदाऱ्या, योगायोग या सगळ्यांमुळे आपण बहुतेकवेळा नकळत एका वेगळ्याच वाटेवर येऊन पोहोचतो आणि जेव्हा असे घडते तेव्हा आपल्या अंतरंगाच्या आत एक दरी तयार होते, आपण ज्या आयुष्याची कल्पना केली होती आणि जे आयुष्य आपण प्रत्यक्षात जगतोय, त्यामधली.
हीच ती वास्तव आणि अपेक्षा ह्यातील दरी ज्यातून निर्माण होतात दोन भावना, पश्चात्ताप व खंत!
काही गोष्टी आपल्या हातात नव्हत्या, काही निर्णय त्या वेळी योग्य वाटले, तर काही गोष्टी काळाच्या ओघात बदलल्या. पण मन मात्र मागे वळून पाहत राहतं. अशा वेळी अनेक जण ही भावना “पश्चात्ताप” म्हणून ओळखतात. पण पश्चात्ताप आणि खंत यात फरक आहे.
पश्चात्ताप बहुतेक वेळा एखाद्या ठरावीक निर्णयावर केंद्रित असतो, “तो निर्णय घेतला नसता तर…” यात स्वतःला दोष देणं जास्त असतं.
ह्या उलट, खंत मात्र अधिक व्यापक असते. ती एका निर्णयाची नसून, संपूर्ण आयुष्याच्या प्रवासाची जाणीव असते. “माझं आयुष्य असं वळण घेईल असं वाटलं नव्हतं.” या वाक्यात स्वतःला दोष कमी आणि हरवलेल्या शक्यतांचं दु:ख जास्त असतं.
मानसशास्त्रीय भाषेत सांगायचं तर, पश्चात्ताप कृतीकेंद्रित असतो, तर खंत ही ओळख आणि अर्थाशी जोडलेली असते.
परंतू खंत नेमकी कशाची असते? न जगलेल्या शक्यतांची. वेळ निघून गेल्याची. “मी वेगळं आयुष्य जगू शकलो असतो” या कल्पनेची. ही भावना दु:खासारखी तीव्र नसते, पण ती मनात टिकून राहते, कधी शांतपणे, कधी अचानक उफाळून.
आजच्या काळात आपल्यापैकी कित्येकांना ही खंत अधिक तीव्र का जाणवते, हे समजून घेणं देखील फार महत्त्वाचं आहे.
समाजमाध्यमांवर सतत दिसणारं इतरांचं ‘चांगलं चाललेलं’ आयुष्य, यशाची सरळ रेषेतली मोजमापं, आणि वेळ हातातून निसटतोय ही जाणीव, या सगळ्यामुळे मनातली ही खंत वाढतच जाते. मानसशास्त्र सांगतं की खंत ही grief चंच एक रूप आहे, अर्थात न जगलेल्या आयुष्याचा शोक. तिला पूर्णपणे नाकारलं, तर ती चिडचिड, थकवा, उदासीनतेत बदलू शकते. पण तिला ओळखणं, स्वीकारणं ही स्वतःतल्या स्वत्वाला ओळखायची पहिली पायरी आहे.
मग खंत समजून घ्यायची कशी व तिचे करायचे काय?
आणि गरज भासल्यास समुपदेशकाची मदत घ्यावी, मदत घेणे हा कमकुवतपणा नसून स्वतःकडे पाहण्याची धैर्यपूर्ण दिशा आहे.
लक्षात ठेवा, आपलं आयुष्य अपेक्षेपेक्षा वेगळं निघालंय, याचा अर्थ ते चुकलेलं आहे असा नाही. मुळात आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही. भोजनाच्या ताटात रोज तेच वाढलेलं चालेल का? कधी गोड कधी तिखट, कधी तुरट, कधी आंबट, तर कधी पार कडू..सगळंच हवं ना..! मग तसंच जरा आडवळणाचं वेगळं आयुष्यही अर्थपूर्ण असूच शकतं.
आपल्याला वाटणारी खंत ही थांबवणारी नसते; ती दिशा दाखवणारी असते, आपल्याला काय महत्त्वाचं आहे, हे पुन्हा आठवण करून देणारी.
आणि तिच्याकडे वेळेत लक्ष दिले, तर तीच खंत नव्या अर्थाची सुरुवात ठरू शकते.

- मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा
७८२१९३४८९४