‘गोवन वार्ता’च्या महा​चित्रकला स्पर्धेत म्हापशाचा विराज जाधव प्रथम

केपेतील नीरज पाटील द्वितीय, तर मडगावच्या अवनी नाईकला तृतीय पारितोषिक


10 hours ago
‘गोवन वार्ता’च्या महा​चित्रकला स्पर्धेत म्हापशाचा विराज जाधव प्रथम

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : ‘गोवन वार्ता’ने यंदाच्या ‘हुप्पा हुय्या’ बाल​विशेषांकाच्या निमित्ताने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या महाचित्रकला स्पर्धेत म्हापसा येथील जी. एस. आमोणकर विद्यामंदिरच्या विराज चंद्रकांत जाधव याने १० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. केपे येथील सरकारी प्राथमिक शाळा, कुंभारवाडा-शिरवईच्या नीरज नागेश पाटीलने ७ हजार रुपयांचे द्वितीय, तर मडगावमधील विद्याभुवन कोकणी शाळेच्या अवनी प्रवीण नाईकने ५ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक जिंकले.
प्राथमिक स्तरावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या हेतूने ‘गोवन वार्ता’ने दोन वर्षांपूर्वी ‘हुप्पा हुय्या’ हा वार्षिक बालविशेषांक प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. दोन्ही वर्षी विद्यार्थी, पालकांकडून ‘हुप्पा हुय्या’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदाच्या विशेषांकानिमित्त भरघोस पारितोषिकांच्या महाचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एका शाळेकडून केवळ दोन विद्यार्थ्यांच्या नावांची शिफारस करण्याची अट घालण्यात आली होती. त्यानुसार स्पर्धेला राज्यभरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत २१६ प्रवेशिका पाठवल्या होत्या. रदिमा जोगळे, वृषाली मेथा आणि नारायण पिसुर्लेकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार, ५ हजार रुपये, प्रशस्तिपत्रे आणि चषके देण्यात येणार आहेत. याशिवाय बाराही तालुक्यांतील बारा उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी २ हजार रुपये, प्रशस्तिपत्रे आणि चषक देण्यात येणार आहेत. याशिवाय परीक्षकांनी शिफारस केलेल्या तीन स्पर्धकांनाही गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेतील पहिली १५ चित्रे ‘हुप्पा हुय्या’ बालविशेषांकातून, तर इतर निवडक चित्रे ‘गोवन वार्ता’च्या दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘हुप्पा हुय्या’ पुरवणीत छापण्यात येणार आहेत. दरम्यान, पारितोषिक वितरण समारंभाची तारीख, वेळ आणि ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

विजेते
प्रथम : विराज चंद्रकांत जाधव (जी. एस. आमोणकर विद्यामंदिर, म्हापसा)
द्वितीय : नीरज नागेश पाटील (सरकारी प्राथमिक शाळा, कुंभारवाडा-शिरवई, केपे)
तृतीय : अवनी प्रवीण नाईक (विद्याभुवन कोकणी शाळा, मडगाव)

बारा तालुक्यांतील बारा उत्तेजनार्थ
पेडणे : दीपल लवू राऊळ (हुतात्मा मनोहर पेडणेकर सरकारी उच्च प्राथमिक विद्यालय, पेडणे)
बार्देश : विशांत प्रसाद मांजरेकर (श्रीराम विद्यामंदिर, कोलवाळ)
तिसवाडी : प्रणया अमित नार्वेकर (के. बी. हेडगेवार, प्राथमिक शाळा, कुजिरा)
डिचोली : सान्वी संतोष वाघुर्मेकर (सरकारी प्राथमिक शाळा, डिंगणे-सुर्ला)
सत्तरी : सुहास सिद्धेश गावस (युनिटी प्राथमिक शाळा, वाळपई)
फोंडा : पूर्व पी. गावकर (डॉ. सखाराम गुडे प्राथमिक शाळा, वजनगाळ-शिरोडा)
सासष्टी : आलिया कालिदास गावकर (सेंट अॅनीस स्कूल, मडगाव)
मुरगाव : परी कुमारी (सरकारी उच्च प्राथमिक स्कूल, सत्रांत-कुठ्ठाळी)
सांगे : निहाल नीळकंठ गावकर (सरकारी प्राथमिक शाळा, केंद्रा-सांगे)
केपे : शौर्य एस. गावकर (टिनी टोट्स प्राथमिक शाळा, केपे)
धारबांदोडा : वंश बी. बंदिवाडर (सरकारी​ प्राथमिक शाळा, गावठण-पिळये)
काणकोण : वरद दिलीप सुदीर (सरकारी​ प्राथमिक शाळा, लोलये)
परीक्षकांनी शिफारस केलेले
आदिती दिगंबर नेने : सरकारी प्राथमिक शाळा, सोनाळ, वाळपई
सिद्धार्थ समीर होमखंडे : मुष्टिफंड संस्था, श्री महालक्ष्मी प्राथमिक शाळा, तिसवाडी
ईशा अमेय साळकर : द रोझरी स्कूल, मिरामार, तिसवाडी