आराेपीने भोगलेला कारावास जन्मठेपेत गृहीत धरा!

उच्च न्यायालय : २०१३ मधील खूनप्रकरणी ओस्बान फर्नांडिसला जन्मठेप


11 hours ago
आराेपीने भोगलेला कारावास जन्मठेपेत गृहीत धरा!

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : मेरशी येथे वास्तव्यास असलेल्या मूळ गडहिंग्लज (कोल्हापूर) येथील शिवाजी नाईक आणि त्यांच्या पत्नी यांचा २०१३ मध्ये खून झाला होता. या प्रकरणातील आरोपी ओस्बान लुकास फर्नांडिस याने दोन्ही खटल्यांच्या सुनावणीवेळी भोगलेला ११ वर्षे आणि तीन महिन्यांचा कारावास जन्मठेपेच्या शिक्षेसाठी गृहीत धरावा, असा आदेश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. मकरंद कर्णिक आणि न्या. वाल्मिकी मिनेझिस या द्विसदस्यीय न्यायपीठाने दिला आहे.
मेरशी येथे आरोपी ओस्बान फर्नांडिस आणि रमेश बागवे यांनी ९ मे २०१३ रोजी शिवाजी नाईक यांचा खून केला होता. शिवाजी नाईक यांचा मृतदेह जेसीबीच्या साहाय्याने फर्नांडिस यांच्या जमिनीत पुरला होता. शिवाजी नाईक यांच्या खूनाबाबत त्यांची पत्नी आणि मुले वाच्यता करतील, या भीतीने आरोपींनी त्यांना गडहिंग्लज येथे पोहोचवण्याच्या बहाण्याने १३ मे २०१३ रोजी गाडीत बसवले आणि अनमोड घाटात मुलांच्या समोरच आईचा गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह त्यांनी दरीत फेकून दिला. दोन्ही मुलांनाही दरीत फेकले. मात्र सुदैवाने मुले वाचली. दरीत फेकलेली आठ वर्षीय मुलगी आणि पाच वर्षीय मुलगा रात्रीच्या काळोखातून कशीबशी मुख्य रस्त्यावर आली. त्यावेळी लोंढ्याहून मडगावकडे येणाऱ्या बाॅनावॅन्चर डिसोझा यांनी १४ मे २०१३ रोजी पहाटे वाचलेल्या मुलांना मदत केली. कुळे पोलिसांना माहिती देऊन त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते.
शिवाजी नाईक यांच्या खून प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी, तर त्यांच्या पत्नीच्या खून प्रकरणी कुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आरोपी ओस्बान फर्नांडिस आणि रमेश बागवे यांना १४ मे २०१३ रोजी अटक केली होती. शिवाजी नाईक यांच्या पत्नीच्या खून प्रकरणी बाल न्यायालयाने त्यांना ३० एप्रिल २०१९ रोजी जन्मठेप आणि इतर शिक्षा ठोठावली होती. शिवाजी नाईक यांच्या खून प्रकरणी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०२० रोजी जन्मठेप आणि इतर शिक्षा ठोठावली होती. गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने वरील दोन्ही शिक्षा कायम ठेवल्या होत्या.
आरोपीची उच्च न्यायालयात याचिका
आरोपी ओस्बान फर्नांडिस याने दोन्ही खटल्यांच्या सुनावणीवेळी भोगलेला ११ वर्षे आणि ३ महिन्यांचा कारावास जन्मठेपेच्या शिक्षेसाठी गृहीत धरण्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आरोपी फर्नांडिसतर्फे अॅड. साहील सरदेसाई यांनी युक्तिवाद केला. त्यांनी दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या संदर्भाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने वरील आदेश जारी केला.