‘पर्यटन’चा काऊंटर बंद करण्यावर दूधसागर टूर ऑपरेटर संघटना ठाम

पर्यटन हंगाम सुरू करण्यास विरोध : जीप मालकांमध्ये फूट घालण्याच्या हालचालींना वेग

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st October, 11:48 pm
‘पर्यटन’चा काऊंटर बंद करण्यावर दूधसागर टूर ऑपरेटर संघटना ठाम

कुळे येथे पत्रकरांना माहिती देताना अध्यक्ष नीलेश वेळीप व इतर.

फोंडा : कुळे येथील दूधसागरवरील पर्यटन हंगाम सुरू करण्याची तयारी सोमवारी सरकारने केली होती. परंतु सोमवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने कडक पोलीस बंदोबस्तात पर्यटन हंगाम सुरू करण्याचा प्रयत्न फसला. दूधसागर टूर ऑपरेटर संघटनेने गोवा पर्यटन विकास मंडळाने सुरू केलेला काउंटर बंद केल्याशिवाय पर्यटन हंगाम सुरू न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सध्या जीप मालकांमध्ये फूट पाडण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे दूधसागर पर्यटन हंगाम यावर्षी वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वाढली आहे.
जानेवारी महिन्यापासून गोवा पर्यटन विकास मंडळाने काउंटर सुरू करून पर्यटकांकडून अधिक रक्कम आकारण्यात सुरुवात केली होती. त्यामुळे दूधसागर धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट दिसून आली. याचा परिणाम जीप मालकांच्या व्यावसायावर दिसून आला. दूधसागर टूर ऑपेरेटर संघटनेचे माजी अध्यक्ष अशोक खांडेपारकर, सचिव सत्यवान नाईक व खजिनदार मंगलदास च्यारी यांनी संघटनेची बैठक न घेता स्वतः एका सेवा पूरविणाऱ्या व्यक्तीकडे वेबसाईट वापरण्यासाठी करार केला होता. त्यामुळे नवीन समितीतर्फे त्या तिघांविरुद्ध कुळे पोलीस स्थानकात रीतसर तक्रार देण्यात आली आहे. सोमवारी अध्यक्ष नीलेश वेळीप व अन्य पदाधिकाऱ्यांनी निरीक्षक राघोबा कामत यांची भेट घेऊन चर्चा केली.
कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक राघोबा कामत यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना संघटनेचे अध्यक्ष नीलेश वेळीप यांनी सांगितले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत निश्चितच जीप मालकांचा प्रश्न सोडविणार आहेत. गोवा पर्यटन विकास मंडळाने काउंटर सुरु केल्यानंतर पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्याचा परिणाम जीप मालकांना भोगावा लागत आहे. त्यामुळे गोवा पर्यटन विकास मंडळाने सुरू केलेला काउंटर कायमचा बंद करण्याची मागणी जीप मालक करीत आहेत. तसेच वेबसाईट पुन्हा संघटनेकडे घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. धबधबा पाहण्यासाठी येणारे पर्यटक रक्कम पाहूनच माघारी जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्यटन हंगाम सुरू करण्यासाठी आवश्यक तोडगा काढण्याची गरज आहे. अन्यथा जीप मालक आर्थिक संकटात सापडणार असल्याचे सांगितले.
जीप मालकांमध्ये फूट
दरवर्षी दि. २ ऑक्टोबर रोजी दूधसागर पर्यटन हंगामाचा शुभारंभ केला जात होता. यावर्षी गोवा पर्यटन विकास मंडळाने काउंटर सुरू केल्याने जीप मालक हा काउंटर बंद केल्याशिवाय व्यवसाय सुरू करण्यास नकार देत आहेत. पण काही जीप मालक काउंटर सुरु ठेवून पर्यटन हंगाम सूरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. काही जीप मालकांनी मोले येथून दूधसागर धबधब्यावर पर्यटकांना घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मोठ्या नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता वाढली आहे.