१०० हून ​अधिक घरफोड्या करणाऱ्या लोकेश सुतारला अटक

जुने गोवा पोलिसांनी महाराष्ट्रात जाऊन आवळल्या मुसक्या


21st October, 12:24 am
१०० हून ​अधिक घरफोड्या करणाऱ्या लोकेश सुतारला अटक

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : जुने गोवा येथील फ्लॅट फोडून ३००० रुपयांची चोरी केल्याच्या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी आंतरराज्य १०० हून अधिक चोरी प्रकरणात सहभाग असलेला सराईत चोर लोकेश रावसाहेब सुतार (३०, रा. मिरज, जि. सांगली) याच्या मुसक्या आवळल्या. सुतार याने त्याच्या हद्दीतील दोन फ्लॅटमध्ये चोरी केल्याचे समोर आले आहे.
जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सीमा सिंग यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, त्यांच्या शेजारील बिनय कुमार झा यांचा फ्लॅट २७ सप्टेंबर २०२४ रोजी फोडला होता. चोराने कपाटात ठेवलेले ३ हजार रुपये चोरले होते. तक्रारीची दखल घेऊन जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक करिष्मा प्रभू यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाची मदत घेऊन पुरावे गोळा केले. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज तपासले, तसेच इतर माहिती मिळवली. पुढील तपासात पोलिसांना या प्रकरणात आंतरराज्य १०० हून अधिक चोऱ्यात सहभागी असलेला लोकेश सुतार याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांचे पथक त्याचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्रात पाठवण्यात आले. संशयित लोकेश सुतार कवठे-महांकाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत असल्याचे समोर आले. तेथील पोलिसांच्या मदतीने जुने गोवा पोलिसांनी सुतार याच्या मुसक्या आवळल्या. त्याला गोव्यात आणून अटक केली.
लोकेशचा आणखी एका चोरीतही सहभाग
पोलिसांनी संशयित लोकेशची कसून चौकशी केली असता, जुने गोवा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील आणखी एका ठिकाणी त्याचे चोरी केल्याचे समोर आले . पोलिसांनी लोकेशला दुसऱ्या प्रकरणातही अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी ठोठावली आहे.