ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला रवाना

भारत आणि चीनमधील एलएसीवरील सैन्याच्या गस्तीबाबत चर्चा होणार का याकडे लक्ष

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला रवाना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दोन दिवस (२२-२३ ऑक्टोबर) रशियाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. ब्रिक्स परिषदेसोबतच रशियात नरेंद्र मोदी कोणत्या देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठक घेणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियातील कझानमध्ये ब्रिक्स सदस्य देशांच्या समकक्षांशी द्विपक्षीय बैठका घेणार आहेत, असे रशियातील भारताचे राजदूत विनय कुमार यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांचा या वर्षातील हा दुसरा रशिया दौरा आहे. जुलै महिन्यातील ८-९ तारखेला त्यांनी रशियाला भेट दिली होती.

 "या परिषदेत आर्थिक सहकार्य, हवामान बदल आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यासारख्या जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यावर भर दिला जाईल." अशी माहिती मिळाली आहे तसेच ब्रिक्स परिषदेसोबतच नरेंद्र मोदी कोणत्या देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठक घेणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

विशेष म्हणजे भारत आणि चीनमध्ये बैठक होणार का याकडेही सर्वांचे विशेष लक्ष आहे. कारण गेल्या अनेक आठवड्यांपासून भारत आणि चीनमध्ये राजनैतिक पातळीवर तसेच लष्करी पातळीवर एलएसीवरील सैन्याच्या गस्तीबाबत चर्चा सुरू होती. नियंत्रण रेषेवर म्हणजेच एलएसीवरील सैन्याच्या गस्तीबाबत एक महत्वपूर्ण करार करण्यात आलाय. या करारानंतर दोन्ही देशांचे सैन्य भारत-चीन सीमेवरून माघार घेतील आणि एलएसीवरून २०२० साली सुरू झालेला वाद संपुष्टात येईल, अशी आशा भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी व्यक्त केली आहे.

२०२० मध्ये पूर्व लडाखमध्ये हिंसक संघर्ष :- 

सीमांतर्गत वाद सोडवण्यासाठी भारत आणि चीनमध्ये अनेकदा चर्चा झाल्या मात्र, यावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. २०२० मध्ये पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. ज्यात 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तर, अनेक चिनी सैनिकांचाही यात मृत्यू झाला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे.

हेही वाचा