महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे-फडणविसांची गुपचुप बैठक; 'मविआ'त खळबळ

जागावाटपावरून महाविकास आघाडीत खडाजंगी सुरू असून, जागांचा निर्णय अद्याप झालेला नाही. नुकत्याच पार पडलेल्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे. 'मविआ'त सगळे काही आलबेल नाही, याचेच हे उदाहरण आहे असे राजकीय जाणकार म्हणत आहेत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
21st October, 02:50 pm
महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे-फडणविसांची गुपचुप बैठक; 'मविआ'त खळबळ

मुंबई : थोड्याच दिवसांत महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते रणनीती आखत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या पक्षांत थेट लढत हॉट असून काही ठिकाणी शेकाप, मनसे, रिपाई तसेच बहुजन वंचित आघाडीदेखील जागा लढवत आहेत. दरम्यान काही पक्षांनी जागावाटप केले आहे मात्र काही जागांवर निर्णय न होऊ शकल्याने आघाड्यांत दुफळी माजली आहे. यातच शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत गुपचुप भेट घेतल्याचे समोर आले आहे. या चर्चेमुळे महाविकास आघाडीतील शिवसेनेचे (उबाठा)चे जागेचे गणित फिस्कटण्याच्या मार्गवार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.   

समोर आलेल्या माहितीनुसार, या भेटीचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी दिला होता. दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईत दीर्घकाल विविध राजकीय मुद्यांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र या बैठकीनंतरच काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा)मध्ये जागावाटपाचा मुद्दा अडकला आहे. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यात बिनसल्याच्या वावड्या मागे उठल्या होत्या. त्याच बरोबर महाविकास आघाडीच्या बैठकीत थरे गटाच्या नेत्याने 'नाना बैठकीस असतील तर आम्ही बाहेर पडतो' असे विधान केल्याचेही समोर आले होते. 

 काँग्रेस आणि उद्धव गटातील शिवसेना यांच्यात महाविकास आघाडीतील जागांवरून चुरस आहे आणि त्यामुळेच उद्धव आणि फडणवीस यांच्यातील बैठकीला उद्धवचा प्लॅन बीही म्हणता येईल. राजकारणात सर्व काही न्याय्य असते आणि दरवाजे खुले असतात. शिवसेना आणि भाजपमध्ये यापूर्वीही युती होती, दोघांनी मिळून सरकार चालवले होते. आता शिवसेनेचेही दोन तुकडे झाले असून त्यामुळे उद्धव यांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे शिंदे गटाबाबतही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान शिवसेना (उबाठा)च्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मागेच एका यूट्यूब पॉडकास्टमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाचे दिलेले उत्तरच सर्वकाही सांगून जाते. पॉडकास्टच्या होस्टने प्रियंका यांना 'भारताचा सर्वात गुणवान राजकीय नेता कोण ?' असा प्रश्न केला होता. यावर प्रियंका यांनी पंतप्रधान मोदींचे नाव घेतले होते. या आणि अनेक गोष्टींमुळे  उद्धव यांचा बी प्लॅन तयार आहे, यावर शिक्काच बसला आहे. आता काँग्रेससोबतची चर्चा फिस्कटली तर ते कोणताही निर्णय घेऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मात्र यामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे.  


हेही वाचा