राजस्थान : धौलपूरमध्ये भीषण रस्ता अपघात; वेगवान बसने दिली टेम्पोला धडक, १२ ठार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th October, 11:32 am
राजस्थान : धौलपूरमध्ये भीषण रस्ता अपघात; वेगवान बसने दिली टेम्पोला धडक, १२ ठार

जयपूर : धौलपूर येथील राष्ट्रीय महामार्ग-११ ब वर एका भरधाव बसने टेम्पोला धडक दिली. या अपघातात १२  जणांचा मृत्यू झाला, तर बस चालक किरकोळ जखमी झाला. त्याला धौलपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास बारी उपविभागात हा अपघात झाला. मृतांमध्ये आठ मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व सर्व मृतदेह बारी रुग्णालयाच्या शवागारात ठेवले.

मिळालेल्या माहितीनुसार, बारी शहरातील गुमट, करीम कॉलनी येथे राहणाऱ्या कुटुंबातील सुमारे १५  जण लग्न समारंभासाठी सर्मथुरा परिसरातील बरौली येथे बहिणीच्या घरी गेले होते. विवाह सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर रात्री उशिरा सर्वजण टेम्पोमध्ये बसून बारीकडे परतत होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास धौलपूरहून जयपूरकडे जाणाऱ्या भरधाव बसने राष्ट्रीय महामार्ग-११  बी वरील सुन्नीपूर गावाजवळ टेम्पोला जोरदार धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गोंधळ माजला.  यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी घटनास्थळी थांबून पोलिसांना माहिती दिली. या अपघातात बसचेही नुकसान झाले असून, ती पोलिसांनी जप्त केली आहे. 

अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर नागरिकांची गर्दी झाली.

रात्री बारा वाजता जखमींना बारी रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय पथकाने सर्वांना तातडीने उपचार देण्याचा प्रयत्न केला. १४  लोकांना रुग्णालयात आणण्यात आले, त्यापैकी १०  जणांचा मृत्यू झाला. चार जखमींना गंभीर अवस्थेत ढोलपूरला रेफर करण्यात आले, मात्र दोघांचा वाटेतच मृत्यू झाला. २ जखमींवर धौलपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बारी हॉस्पिटलमधून गंभीर अवस्थेत चार जणांना धौलपूरला रेफर करण्यात आले, मात्र दोघांचा वाटेतच मृत्यू झाला.

हेही वाचा