गुजरातमध्ये बनावट न्यायालयाचा पर्दाफाश ! तोतया न्यायाधीशाने बळकावली १०० एकर जमीन

दिवाणी निबंधकांनी कारंज पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर झाला बनावट दरबाराचा भांडाफोड

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
गुजरातमध्ये बनावट न्यायालयाचा पर्दाफाश ! तोतया न्यायाधीशाने बळकावली १०० एकर जमीन

गांधीनगर: गुजरातमच्या गांधीनगरमध्ये एका व्यक्तीने बनावट न्यायालय तयार केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. गेल्या ५ वर्षांपासून सदर व्यक्ती हे न्यायालय स्वतः न्यायाधीश म्हणून चालवत असून या संशयित इसमाने सुमारे १०० एकर सरकारी जमीन संपादित करण्याचे आदेश दिल्याचे प्रकरण देखील आता उघड झाले आहे. मॉरिस सॅम्युअल असे या संशयीत आरोपीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. 

ज्यांच्या जमिनींच्या वादाचे खटले शहर दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहेत, अशा लोकांना मॉरिस गाठायचा. जमिनीचे व्यवहार सोडवण्यासाठी तो त्या लोकांना असे भासवायचा की, न्यायालयाने कायदेशीर विवादांचे निराकरण करण्यासाठी त्यांना मध्यस्थ म्हणून नियुक्त केले आहे. हे सर्व करण्यासाठी त्याने आपल्या कार्यालयात बनावट न्यायालय स्थापन करत वास्तविक न्यायालयासारखे वातावरण तयार केले होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी मॉरिस सॅम्युअलने २०१९ मध्ये कोट्यवधी रुपयांच्या सुमारे १०० एकर सरकारी जमिनीशी संबंधित प्रकरणात आपल्या ग्राहकाच्या बाजूने आदेश दिला होता. याप्रकरणी शहर दिवाणी न्यायालयाच्या निबंधकांनी कारंज पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर या बनावट न्यायाधीशावर कारवाई करून त्याच्या बनावट दरबाराचा भांडाफोड करण्यात आला आहे. 

मित्रांनाच वकील म्हणून उभे करायचा - 

कोर्टाप्रमाणे डिझाइन केलेल्या गांधीनगर येथील कार्यालयात संशयित आरोपी ग्राहकांना बोलवत असे. खटल्यातील युक्तिवाद करण्यासाठी त्याचे साथीदार न्यायालयीन कर्मचारी आणि वकील असल्याचे दाखवून कारवाई खरी असल्याचे भासवत असत. या युक्तीने आरोपी मॉरिसने 11 हून अधिक प्रकरणांमध्ये ग्राहकांच्या बाजूने आदेश दिले होते.

गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल -

या बनावट न्यायाधीशाविरोधात भारतीय दंड संहिता कलम १७० (सार्वजनिक सेवकाच्या पदावर असल्याचे भासवणे) आणि ४१९ (तोतयागिरी करून फसवणूक करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा