माजी खासदार नीलेश राणे उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करणार शिवसेनेमध्ये प्रवेश

सायंकाळी ४ वाजता कुडाळ हायस्कूल मैदानावर होणार पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
माजी खासदार नीलेश राणे उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करणार शिवसेनेमध्ये प्रवेश

कुडाळ : माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांची ज्या पक्षातून आणि ज्या चिन्हावर सुरुवात झाली त्या धनुष्यबाणावर निवडणूक लढण्याची मला संधी मिळत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. मी बुधवार २३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे माजी खासदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी माजी नगराध्यक्ष विनायक राणे, माजी नगरसेवक राकेश कांदे हे उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले, २०१९ मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे आमदार नीतेश आणि यांच्या समवेत मी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी मला सहकार्य केले. मला त्यांनी समजून घेतले आणि साथही दिली.

युती धर्माच्या शिष्टाचारानुसार नेत्यांनी ठरवलेल्या प्रमाणे निर्णय होत असतात आणि त्या निर्णयामध्ये महायुती मधून निवडणूक लढवण्याची मला संधी मिळत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सर्व मंत्री महोदयांच्या उपस्थितीत बुधवार २३ ऑक्टोबर रोजी सायं. ४ वा. कुडाळ हायस्कूल मैदानावर माझा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आतापर्यंत मला सहकार्य केले आहे तसेच यापुढे एक करतील अशी आशा आहे.

१९ वर्षांनी धनुष्यबाण चिन्हावर लढवणार निवडणूक:-

माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांची शिवसेना पक्षातून सुरुवात झाली. त्यांनी या निवडणुका लढल्या त्या धनुष्यबाण चिन्हावर होत्या. ज्या पक्षातून त्यांची सुरुवात झाली त्याच पक्षातून आणि त्याच चिन्हावर निवडणूक लढण्याची संधी मला मिळत आहे, हे माझे भाग्य आहे.  ही संधी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मी ही निवडणूक काही मिळवण्यासाठी लढत नाही. गेली १० वर्ष या मतदारसंघांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही. कोणत्याही प्रकारचे व्हिजन ठेवून काम केलेले नाही हा मतदारसंघ महाराष्ट्रातील ५ विकसित मतदारसंघांमध्ये असला पाहिजे या व्हिजनने मला काम करायचं आहे. याला जनता साथ देणार हा विश्वास आहे. - नीलेश राणे

हेही वाचा