साल्वादोर द मुंद येथे ऑनलाईन क्रिकेट बेटींग प्रकरणी पाच जणांना अटक

१.७० लाखांच्या वस्तू जप्त

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
3 hours ago
साल्वादोर द मुंद येथे ऑनलाईन क्रिकेट बेटींग प्रकरणी पाच जणांना अटक

म्हापसा: साल्वादोर द मुंद येथील सामब्रेका नामक बंगल्यामध्ये ऑनलाईन क्रिकेट बेटींग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि. २१)रात्री पोलिसांनी सदर बंगल्यावर छापा टाकला. त्यावेळी घटनास्थळी सट्टेबाजी सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना पाच जणांना रंगेहात पकडले असून संशयितांकडून २ लॅपटॉप, १० मोबाईल फोन व एक राऊटर या जुगारासाठी वापरण्यात येणार्‍या १ लाख ७० हजारांच्या वस्तू हस्तगत केल्या आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून रेड्डी अन्ना बुकी नामक अ‍ॅप मार्फत हा सट्टा चालवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. रूचित कुमार (रा. बिहार), प्रंजल भाटी (रा. मध्यप्रदेश), निखिल कुमार (रा. बिहार), कुनाल कुमार (रा.मध्यप्रदेश) व वंश शर्मा (रा. कर्नाटक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांविरूध्द पोलिसांनी गोवा दमण दीव सार्वजनिक जुगार प्रतिबंधक कायदा कलम ३ व ४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. 

पोलीस निरीक्षक राहुल परब, काँस्टेबल महादेव नाईक, तुषार राऊत, नितेश गावडे व सहकार्‍यांनी केली. पुढील तपास पोलीस अधीक्षक अक्षत कौशल व उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

सामब्रेका नामक बंगल्यात दीड महिन्यांपासून सुरू होता जुगार:-

हा सट्टेबाजारचा प्रकार संशयितांनी दीड महिन्यापासून चालवला होता. यासाठी त्यांनी सामब्रेका हा बंगला भाड्याने घेतला होता. या बंगल्यातून संशयित आरोपी प्रथम श्रेणी पासून इतर मोठ्या जागतिक क्रिकेट आणि फुटबॉल व इतर क्रीडा प्रकारातील स्पर्धा आणि सामन्यांवर आपल्या अ‍ॅपद्वारे ते बेटींग घेत होते.

हेही वाचा