सासष्टी : साहित्य अकादमींच्या सर्व कार्यक्रमांवर घालणार बहिष्कार

ग्लोबल कोकणी फोरमचा निर्णय : मडगाव रवींद्र भवनबाहेर २६ रोजी मूक निदर्शने

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
21st October, 04:54 pm
सासष्टी : साहित्य अकादमींच्या सर्व कार्यक्रमांवर घालणार बहिष्कार

मडगाव : साहित्य अकादमीकडून रोमी व कन्नडसह इतर लिपींचा आदर केला जात नाही. अकादमी त्यांना देवनागरी कोकणीप्रमाणे समान दर्जा देत नाही, तोपर्यंत साहित्य अकादमीकडून आयोजित कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन ग्लोबल कोकणी फोरम व मांड शोभन मंगळुरुकडून करण्यात आले. तसेच मडगाव रवींद्र भवनच्या बाहेर २६ रोजी मूक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्लोबल कोकणीचे अध्यक्ष केनेडी अफान्सो यांनी दिली. 

ग्लोबल कोकणी फोरमकडून प्रसिध्दीपत्रक काढत अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या रवींद्र भवन मडगावातील कार्यक्रम स्थळाबाहेर २६ रोजी निदर्शने करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. केनेडी यांनी सांगितले की, ग्लोबल कोकणी फोरम व मांड शोभन मंगळुरु संस्थांकडून कोकणी भाषा रसिकांच्या आवाजाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. साहित्य अकादमी रोमी आणि कन्नड लिपीचा आदर करत नाही. त्यामुळे मडगाव रवींद्र भवन येथे 26 व 27 ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय कोकणी परिषदेसह साहित्य अकादमीने आयोजित सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकणार आहे. कोकणी भाषिक रसिक, लेखक, संहिता असोसिएशन, विद्यार्थी यांनी याचा आदर करत बहिष्कारात सहभागी व्हावे. 

साहित्य अकादमीने कोकणी भाषेसाठी केवळ देवनागरी लिपीलाच मान्यता दिली आहे. कोकणीच्या इतर चार लिपींकडे दुर्लक्ष केले आहे. रोमी लिपी, कन्नड, मल्याळम व पर्सो अरबी या भाषेतील कोकणी भाषिक आणि लेखकांच्या साहित्याबाबत भेदभाव भेदभाव केला जात असून हे भारतीय राजघटनेच्या तसेच मुलभूत अधिकाराच्या विरोधात आहे. एक भाषा व अनेक लिपी हे कोकणातील समृध्द भाषिक आणि सांस्कृतिक विविधता दर्शवतात. प्रत्येक लिपीचा इतिहास असून त्यांनी कोकणी साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळेच  साहित्य अकादमीने भेदभाव करणारे एक भाषा, एक लिपी धोरण बाजूला ठेवले पाहिजे, असे मत केनेडी यांनी व्यक्त केले.

मडगाव रवींद्र भवन येथे २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० ते १० या वेळेत मूक धरणे आंदोलन केले जाईल त्यानंतर  मडगाव लोहिया मैदानावर ओपन माईक सेशन आयोजित केले आहे. यासाठी कर्नाटक कोकणी लेखक संघ व मंगळुरु येथील मांड शोभन मंगळुरुचे सदस्यही येणार आहेत. कोकणी लेखक, कोकणी संघटना, कोकणी वक्ते, लेखक, वकील, शिक्षणतज्ञ, तियात्रिस्त आणि कोकणीशी निगडीत असलेल्या सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा