बार्देश : ग्रामसभेत मान्यता घेतल्याशिवाय साळगावात मेगा प्रकल्प नको!

तांत्रिक मुद्द्यांमुळे ग्रामसभेला अधिकार नसल्याचे सरपंचांचे स्पष्टीकरण

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
21st October, 12:31 am
बार्देश : ग्रामसभेत मान्यता घेतल्याशिवाय साळगावात मेगा प्रकल्प नको!

ग्रामसभेत बोलताना पंच. (अनिल शंखवाळकर)

पर्वरी :
ग्रामसभेत ग्रामस्थांची मान्यता घेतल्याशिवाय साळगावमध्ये मेगा प्रकल्पांना परवानगी देऊ नये, असे ग्रामस्थांनी ग्रामसभेत सांगितले. मात्र नगर नियोजन खात्याने प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर पंचायत बिल्डरला बांधकाम परवाना देण्यास बांधील असते, पंचायतीने बांधकाम परवाना न दिल्यास बिल्डर पंचायत संचालकाकडे जाऊन परवानगी घेतो, असे स्पष्टीकरण सरपंचांनी दिले.
रविवारी झालेल्या साळगावच्या ग्रामसभेत मेगा प्रकल्प, रस्त्यांचे हॉटमिक्सिंग करणे, डास पैदास रोखण्यासाठी फॉगिंग, कचरा उचलणे, नाल्यांची सफाई, झोन बदलणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी डायगो फर्नांडिस यांनी मेगा हाऊसिंग प्रकल्पांचा मुद्दा मांडला. ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय पंचायतीने अशा प्रकल्पांना परवानगी देऊ नये. ग्रामसभेत प्रथम यावर चर्चा व्हायला हवी, असे ते म्हणाले. मात्र सरपंच लुकास रेमेडिओस यांनी पंचायतीने बांधकाम परवाना न दिल्यास बिल्डर पंचायत संचालकाकडे जाऊन परवानगी घेतो, असे सांगितले.
दत्तवाडी मंदिर ते कळंगुट-साळगाव हद्दीपर्यंतचा रस्ता दयनीय झाला असून तातडीने दुरुस्ती व हॉटमिक्सिंगची गरज असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. गेल्या आठ महिन्यांपासून सदर रस्ता दुरुस्त करून हॉटमिक्स करण्याची विनंती पंचायतीकडे करण्यात येत आहे. सदर रस्त्याचे हॉटमिक्सिंग तातडीने न केल्यास ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागेल, असे ग्रामस्थांनी सांगितले.
साळगावात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. प्राथमिक आरोग्य केंद्राला गावात फॉगिंग करण्याची विनंती करावी, असे ग्रामस्थांनी सुचविले. सरपंच रेमेडिओस यांनी सांगितले की, प्राथमिक आरोग्य केंद्राने जेथे डेंग्यूचे रुग्ण आढळले, तेथे फॉगिंग केले आहे.
सरपंच लुकास रेमेडिओस यांनी ग्रामस्थांचे स्वागत केले. त्यानंतर सचिव प्रेमेंद्र मांद्रेकर यांनी ऑगस्टमध्ये झालेल्या ग्रामसभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. उपसरपंच उत्कर्षा कुडणेकर यांनी आभार मानले.

हेही वाचा