गोवा : '.. तोपर्यंत गोवा विद्यापीठातील ती पदे भरू देणार नाही' : गोवा फॉरवर्ड

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
21st October, 04:01 pm
गोवा : '.. तोपर्यंत गोवा विद्यापीठातील ती पदे भरू देणार नाही' : गोवा फॉरवर्ड

पणजी : गोवा विद्यापीठात रिमोट सेन्सिस आणि जीआयएस अभ्यासक्रमासाठी जाहिरात करण्यात आलेल्या पदांबाबत कुलगुरूंनी अजूनही समाधान कारक उत्तरे दिलेली नाहीत. जोपर्यंत आम्हाला उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत ही पदे भरू देणार नाही. प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा गोवा फॉरवर्डचे नेते प्रशांत नाईक यांनी दिला. सोमवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी दीपक कलंगुटकर आणि दिलीप प्रभूदेसाई हेही उपस्थित होते.

नाईक यांनी सांगितले की, याआधीही आम्ही या पदांच्या भरतीला विरोध केला होता. याबाबत आज आम्ही कुलगुरूंना भेटण्यास गेलो होतो. आम्ही त्यांना आरक्षित पदे का काढण्यात आली, पंधरा वर्षे रहिवाशी असण्याची अट का शिथिल करण्यात आली असे काही प्रश्न उपस्थित केले. मात्र आम्हाला कुलगुरूंनी त्यांची योग्य उत्तरे दिली नाही. कोणतीही पदे भरण्यापूर्वी अभ्यासक्रम तयार असणे आवश्यक असते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठाने अजूनही हा अभ्यासक्रम जाहीर केलेला नाही.

ते म्हणाले, विद्यापीठाने आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. अन्यथा आम्ही मोठे आंदोलन करण्यास समर्थ आहोत. विद्यापीठाचे कुलपती म्हणून राज्यपालांनी देखील याची दखल घेणे आवश्यक आहे. विद्यापीठाकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही प्रसंगी राज्यपालांकडे जाणार आहोत. दीक्षांत समारंभात राज्यपालांनी गोवा विद्यापीठात स्थानिकांना प्राधान्य देण्याचे सांगितले होते. मात्र सध्या येथे  स्थानिकांना वगळून केवळ मर्जीतल्या लोकांनाच घेतले जात आहे. 

प्रभूदेसाई म्हणाले की, मागील भेटीत कुलगुरूंनी आम्हाला हा अभ्यासक्रम नवीन असल्याने येथे स्थानिक उमेदवार मिळत नसल्याचे सांगितले. मात्र अशाच प्रकारचा अभ्यासक्रम मडगाव येथील चौगुले कॉलेजमध्ये सात ते आठ वर्ष सुरू आहे. याशिवाय बोर्ड सरकारी महाविद्यालयात देखील हाच अभ्यासक्रम सुरू आहे. विद्यापीठात हा अभ्यासक्रम नव्याने सुरू होत आहे तरी जागा कायमस्वरूपी का भरल्या जात आहेत याचेही उत्तर मिळणे आवश्यक आहे.

हेही वाचा