बार्देश : नवीन जेटींच्या बांधकामाला हळदोणा ग्रामस्थांची हरकत

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
21st October, 12:30 am
बार्देश : नवीन जेटींच्या बांधकामाला हळदोणा ग्रामस्थांची हरकत

ग्रामसभेत बोलताना सरपंच अश्विन डिसोझा. (आग्नेल परेरा)

म्हापसा :
सरकारी किंवा खासगी जमिनीवरील तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी जेटींचे कोणतेही नवीन बांधकाम केले जाऊ नये, असा ठराव हळदोणा ग्रामस्थांनी ग्रामसभेत एकमताने घेतला. विद्यमान जेटीच्या नूतनीकरणाला आक्षेप घेतले नाही.
माजी पंच थॉमस तावारिस यांनी या संदर्भातील मुद्दा मांडला. पर्यटन किंवा अन्य कारणांसाठी खासगी जेटीचा प्रस्ताव पंचायतीकडे सादर करण्यात आला होता का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सध्याच्या जेटीच्या संभाव्य विस्ताराबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. ग्रामस्थ कॉस्मे फर्नांडिस यांनी सांगितले की, नवीन जेटीचा प्रस्ताव असल्यास तो पंचायतीने नाकारायला हवा. पंचायत क्षेत्रात जेटी बांधण्यासाठी असे कोणतेही प्रस्ताव आले नसल्याचे सरपंच अश्विन डिसोझा यांनी स्पष्ट केले. यानंतर ग्रामसभेने गावात नवीन जेटी बांधण्यास मनाई करण्याचा ठराव मंजूर केला.
जोसेफ फर्नांडिस यांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हळदोणातील दोन शैक्षणिक संस्थांजवळ वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी केली. सरपंचांनी वाहतूक पोलिसांना निवेदन देण्याचे मान्य केले.
पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानांतर्गत प्रकल्पांना मंजुरी देण्याच्या उद्देशाने पंचायत विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहितीही सरपंचांनी ग्रामसभेत दिली.

हेही वाचा