गोवा : क्षय मुक्तीसाठी पंचायतीचे सहकार्य आवश्यक : मंत्री राणे

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
21st October, 02:21 pm
गोवा : क्षय मुक्तीसाठी पंचायतीचे सहकार्य आवश्यक : मंत्री राणे

पणजी : राज्यात क्षय मुक्तीसाठी आरोग्य खाते प्रयत्न करत आहे. पंचायत स्तरावर क्षयमुक्तीसाठी पंचायतीचे सहकार्य आवश्यक असल्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. सोमवारी खात्यातर्फे क्षयमुक्त झालेल्या उसगाव आणि शिरोडा पंचायतींच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी अभिनेत्री वर्षा उसगावकर, तियात्रिस्त जॉन डिसिल्वा, संचालक डॉ वंदना धुमे, डॉ रुपा नाईक, श्वेता देसाई आदी उपस्थित होते. 

राणे यांनी सांगितले की, क्षय मुक्तीसाठी आरोग्य खात्याने जागृती मोहीम सुरू केली आहे. अनेकदा या आजाराकडे दुर्लक्ष केले जाते. माझ्या घरात एका गर्भवती मुलीला क्षय रोग झाला होता. मात्र आम्हाला कुणालाच लक्षात आले नाहीं. लक्षणे जास्त झाल्यावर सर्वांना याबाबत समजले. यासाठीच क्षय रोगाची लक्षणे ओळखून वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. 

यासाठी याबाबत जागृती करणे आवश्यक आहे. 

ते म्हणाले, क्षय रोग मुक्तीसाठी आम्ही रॅपिड चाचण्या, कल्चर चाचणी, समुपदेशन,  उपचार, चांगले पोषण आम्ही मोफत देत आहोत. यानुसार ॲड फिल्म बनवण्यात आल्या असून त्या सर्वत्र दाखवल्या जातील. या फिल्ममध्ये आम्ही वर्षा उसगावकर आणि जॉन डिसिल्वा यांना घेऊन बनवल्या आहेत. या दोघांचा जनमानसात चांगला प्रभाव आहे. यामुळे या जागृती मोहिमेला यश येऊन गोवा क्षयमुक्त होईल अशी आमची अपेक्षा आहे.

आम्ही लोकांसोबत

मंत्री राणे यांनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पश्चिम घाटात येणाऱ्या संवेदनशील गावी वगळण्याबाबत मी केंद्रीय मंत्र्यांची सचिवांची बोललो आहे. याविषयी आम्ही लोकांसोबत आहोत. मला खात्री आहे की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हा विषय योग्य पद्धतीने हाताळून आम्हाला न्याय देतील.

महाराष्ट्रात विजय नक्की

राणे म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी माझ्यासोबत गोव्यातील अन्य भाजप पदाधिकारी काम करत आहेत. भाजप सरकारने तेथे केलेले काम पाहता आमचा पक्ष आणि महायुती बहुमताने जिंकून येईल असा आम्हाला विश्वास आहे.

हेही वाचा