शॅक हंगामाला पावसाचा फटका

पावसामुळे ग्राहकांची माघार : शॅकमधील सामानांचे नुकसान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11 hours ago
शॅक हंगामाला पावसाचा फटका

पणजी : राज्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच पर्यटन हंगामात शॅक सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. पण पावसाने अजूनही माघार न घेतल्यामुळे पर्यटकही‌ अद्याप समुद्रकिनारी येत नाहीत. त्यामुळे शॅकधारकांना गिऱ्हाईक होत नाही. तसेच पावसामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने शॅकमधील सामानाची नासधूस झाल्याची तक्रार शॅक मालकांनी केली आहे.
दरवर्षी शॅक्स वाटप होण्यास उशीर होत असे. डिसेंबरपर्यंत शॅक्स सुरू होण्यास उशीर झाल्याने शॅक मालकांचे नुकसान होत होते. यावेळी ऑक्टोबरच्या सुरुवातीला शॅक्सचे वाटप करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी शॅक उभारल्या. मात्र, सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे त्यांचे नुकसान झाले. पावसामुळे ग्राहकांची कमी संख्या आणि समुद्राची पातळी वाढल्याने अनेक शॅक्स खाऱ्या पाण्यात बुडाले.
अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कार्दोज माहिती देताना म्हणाले, पाऊस पडणे नैसर्गिक आहे. पण, आम्हाला त्यासाठी व्यवस्था करावी लागते. वर्षभर कितीही पाऊस पडला तरी त्यासाठी आम्ही आमचा व्यवसाय बंद ठेवू शकत नाही. पावसामुळे शॅकचे नुकसान होऊ नये याची आम्ही योग्य ती खबरदारी घेतो. पण, ग्राहकांची कमतरता ही आमच्यासाठी मोठी समस्या आहे. पाऊस पडत असल्याने एकही पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर येत नाही. त्यामुळे आम्हाला गिऱ्हाईक होत नाही, अशी तक्रार कार्दोज यांनी केली.
समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्याने अनेक शॅक्स पाण्याखाली गेल्याचा फटका आम्हालाही बसला आहे. सरकार आम्हाला फारच कमी नुकसान भरपाई देते. परंतु, शॅकचा विमा असल्याने सर्व नुकसान भरून निघते, असेही कार्दोझ यांनी सांगितले.

शॅक्समध्ये पाणी गेल्याने तीन शॅक्सचे नुकसान
या काळात हवामानाचा अंदाज बांधता येत नाही. शॅक्समध्ये पाणी गेल्याने सुमारे ३ शॅक्सचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शॅक्स बंद ठेवल्यास आम्हाला नुकसान सहन करावे लागेल. यासाठी शॅक मालकांनी सरकारवर अवलंबून न राहता आपल्या शॅकचा विमा काढावा. आतापर्यंत शॅकमध्ये समुद्राचे पाणी गेल्याच्या पाच घटना घडल्या आहेत, असे क्रूझ कार्दोज यांनी सांगितले.

हेही वाचा