कॉमनवेल्थ गेम्समधून हॉकी, क्रिकेट, कुस्ती यासह १२हून अधिक क्रीडा प्रकार वगळले

बजेट फ्रेंडली स्पर्धा घेण्यासाठी स्पर्धेत फक्त १० खेळांचाच समावेश

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
कॉमनवेल्थ गेम्समधून हॉकी, क्रिकेट, कुस्ती यासह १२हून अधिक क्रीडा प्रकार वगळले

स्कॉटलँड : कॉमनवेल्थ गेम्स २०२६  स्कॉटलँडच्या ग्लासगो याठिकाणी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पण ही स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी आणि  क्रीडा चाहत्यांसाठी काहीशी  निराशाजनक ठरणारी आहे. कारण या स्पर्धेत भारतीय खेळाडू हक्काची पदकं मिळवू शकतील असे खेळचं काढून टाकण्यात आले आहेत. वगळण्यात आलेल्या क्रीडा प्रकारांत  हॉकी, क्रिकेट, कुस्ती यांच्यासह रग्बी सेवन, डायव्हिंग, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, रोड सायकलिंग, माऊंटेनबाईक, रिदमिक जिम्नॅस्टिक, स्क्वॅश, टेबल टेनिस, पॅरा टेबल टेनिस, आणि ट्रायथलॉनय पॅरा ट्रायथलॉन यांचा समावेश आहे. 

ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिाय शहराने यजमानपदासाठी नकार दिल्यानंतर स्पर्धेसाठी नव्या ठिकाणाचा शोध घेतला जात होता. अनेक अडचणींचा सामना करत अखेर ग्लासगो इथली जागा निश्चित करण्यात आली.  २३ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे आणि बजेट फ्रेंडली स्पर्धा घेण्यासाठी फक्त १० खेळांचाच समावेश करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. 

भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकासाठी नेहमीच दावेदार राहिला आहे. पुरुष हॉकी संघाने गेल्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं. तर कुस्तीतही भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा राहिला आहे. बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधु सारखे खेळाडू हक्काचे पदक विजेते खेळाडू आहेत. 

२०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत १९ क्रीडा प्रकार खेळवले गेले होते, परंतु २०२६ मध्ये १० क्रीडा प्रकार असणार आहे. त्यामुळे क्रिकेट, टेबल टेनिस, स्क्वॉश आणि रोड रेसिंग हेही खेळ वगळले गेले आहेत. याआधी व्हिक्टोरीया येथे ही स्पर्धा पार पडणार होती, परंतु आर्थिक अडचणीमुळे त्यांनी मागील वर्षी माघार घेतली. त्यानंतर ग्लासगोने स्पर्धा आयोजनासाठी इच्छा व्यक्त केली.