रणजी चषक : गोव्याची यजमान सिक्कीमवर एकतर्फी मात

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th October, 11:05 pm
रणजी चषक : गोव्याची यजमान सिक्कीमवर एकतर्फी मात

पणजी : सिक्कीमच्या रंगोप येथे खेळवण्यात आलेल्या रणजी चषक प्लेट लीगच्या सामन्यात पाहुण्या गोव्याने यजमान सिक्कीमचा एक डाव राखून व ५३ धावांनी पराभव केला. चौथ्या व अंतिम दिवशी गोव्याने सिक्कीमचे उर्वरीत फलंदाज बाद करत विजयावर शिक्कामोर्तब केला.      

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सिक्कीमसाठी डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांनी ठराविक अंतरावर आपले फलंदाज गमावण्यास सुरुवात केली. त्यांचे केवळ तीन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. अशा प्रकारे सिक्कीमचा संपूर्ण संघ केवळ १०८ धावांत आटोपला. गोव्यातर्फे गोलंदाजीत हेरंब परबने सर्वाधिक ३ तर अर्जुन तेंडुलकर, दर्शन मिसाळ व मोहित रेडकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद करण्यात यश मिळवले. शुभम तारीला एक यश मिळाले.      

१०८ धावांची माफक आघाडी घेऊन उतरलेल्या गोव्यासाठी डावाची शानदार सुरुवात झाली. या डावात गोव्यातर्फे सलामीवीर रोहन कदमने ५५ तर सुयश प्रभुदेसाई याने ५४ धावा केल्यानंतर मंथन खुटकर (१०४) व कृष्णमूर्ती सिद्धार्थ (१३०) यांनी शतके झळकावली. अशा प्रकारे गोव्याने आपल्या पहिल्या डावात ४ गडी गमावून ३६७ धावांवर डावाची घोषणा करत सिक्कीमवर २५९ धावांची आघाडी घेतली.      

सिक्कीमने दुसऱ्या डावात संघर्ष करताना चांगले प्रदर्शन केले मात्र गोव्याची आघाडी तोडण्यात त्यांना अपयश आले व संपूर्ण संघ २०६ धावांत आटोपला. या डावात गोव्यातर्फे अर्जुन तेंडुलकर व दर्शन मिसाळ यांनी प्रत्येकी ४ तर मोहित रेडकरला एक यश मिळाले. कृष्णमूर्ती सिद्धार्थला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.