भारत - न्यूझीलंड कसोटी रंगतदार ​स्थितीत

सरर्फराजचे दीडशतक : किवी संघाला विजयासाठी १०७ धावांची आवश्यकता

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
19th October, 11:54 pm
भारत - न्यूझीलंड कसोटी रंगतदार ​स्थितीत

बंगळूरू : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी भारतीय संघाने ४६२ धावा करत न्यूझीलंडसमोर १०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या डावात अवघ्या ४६ धावांवर गारद झालेल्या भारतीय संघाची दुसऱ्या डावातली कामगिरी दमदार ठरली. पंत-सर्फराजनंतर आलेले फलंदाज स्वस्तात तंबूत परतल्याने न्यूझीलंडसमोर विजयासाठी मोठे आव्हान ठेवण्यात संघाला यश आले नाही.
सर्फराज खान आणि रिषभ पंत यांनी भारतीय संघाला डावाने पराभवाच्या छायेतून बाहेर काढत मजबूत स्थितीत आणण्याचे काम केले. पावसामुळे खेळात तब्बल तीन तासांचा खंड पडला होता, त्यानंतर खेळ सुरू झाल्यावर सर्फराज आणि पंतने भारताच्या दुसऱ्या डावाला स्थैर्य दिले. सर्फराज खानने शनिवारी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने १८ चौकार आणि ३ षटकारांसह १५० धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याला टिम साउथीने ८५ व्या षटकात बाद केले. पुढे, रिषभ पंत ९९ धावांवर बाद झाला आणि त्याचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याने ५५ चेंडूत अर्धशतक झळकावले. गुडघ्याला पट्ट्या बांधलेल्या अवस्थेत मैदानात उतरलेल्या पंतने धडाकेबाज खेळी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढले.
यानंतर आलेल्या फलंदाज फार काही विशेष करू शकले नाहीत. के एल राहुल (१२), रवींद्र जडेजा (५), आर. अश्विन (१५), लवकर तंबूत परतले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज दोघेही शून्यावर बाद झाले, तर कुलदीप यादव ६ धावांवर नाबाद राहिला.
पहिल्या डावात न्यूझीलंडने ४०२ धावा केल्या होत्या आणि ३३६ धावांची आघाडी घेतली होती. मात्र, चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी जोरदार कमबॅक करत ४६२ धावा उभारल्या. भारतीय संघाकडे १०६ धावांची आघाडी असून आता याच्या आत न्यूझीलंडला गुंडाळण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांपुढे असेल.
पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात १५० धावा करणारा सर्फराझ हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. सर्फराझच्या आधी नयन मोंगियाने १९९६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही अनोखी कामगिरी केली होती. त्याच वेळी, १९५३ मध्ये माधव आपटेने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात १६३ धावांची नाबाद खेळी केली होती. उजव्या हाताचा फलंदाज सर्फराझने आपल्या खेळीत १८ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार ठोकले. सर्फराझने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ४२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कसोटीच्या चौथ्या दिवशी सर्फराझने आपली उत्कृष्ट फलंदाजी सुरू ठेवत ११० चेंडूत पहिले कसोटी शतक झळकावले.
सर्फराझ-पंतच्या उत्कृष्ट भागीदारीमुळे न्यूझीलंडने घेतलेली ३५६ धावांची आघाडी दूर करण्यात टीम इंडियाला यश आले. आपल्याच मातीत खेळत भारतीय संघाने दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या करत विरोधी संघाने घेतलेली आघाडी मोडून काढली. १९८५ मध्ये इंग्लंडने पहिल्या डावात ३८० धावांची आघाडी घेतली होती, जी भारताच्या फलंदाजांना संपवण्यात यश आले होते.कोहली-पंतसोबत साकारली महत्त्वाची भागीदारी –बंगळुरु कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहलीसह सर्फराझ खानने भारतीय डाव शानदारपणे हाताळला. कोहलीसह उजव्या त्याने तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. कोहली बाद झाल्यानंतर सर्फराझने ऋषभ पंतसह चौथ्याला दिवसाच्या खेळाला सुरुवात करताना दमदार फटकेबाजी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शानदार फलंदाजी करत १७७ धावांची भागीदारी केली.

एकाच कसोटीत शून्य व दीड शतक झळकावणारे फलंदाज

० आणि १६३* – माधव आपटे विरुद्ध वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन, १९५३
१५२ आणि ० – नयन मोंगिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दिल्ली, १९९६
० आणि १५० – सर्फराझ खान विरुद्ध न्यूझीलंड, बंगळुरू, २०२४
डब्ल्यूटीसी फायनलचे गणित बिघडणार
न्यूझीलंड संघाने पहिला कसोटी सामना जिंकला तर टीम इंडियाला पुढील दोन सामने जिंकावे लागतील कारण, भारतासाठी ऑस्ट्रेलिया दौरा सोपा असणार नाही. भारताला बांगलादेशविरुद्ध सहज विजय मिळाला. पण न्यूझीलंड संघ मात्र भारताला कडवी टक्कर देत आहे. अशातच जर भारताने पहिली कसोटी गमावली, तर यानंतर आणखी ७ कसोटी सामने शिल्लक असतील. ज्यामध्ये भारताला कोणत्याही परिस्थितीत ५ सामने जिंकावे लागतील. पण या ५ कसोटींमध्ये एकही पराभव आणि एकही सामना ड्रॉ झाला तर टीम इंडियाला मोठी किंमत मोजावी लागू शकते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत, भारतीय संघाने ११ सामने खेळले आहेत, ज्यात संघाने ८ सामने जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत. संघाचे एकूण ९८ गुण आहेत आणि गुणांची टक्केवारी ७४.२४ आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यांनी एकूण १२ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले आहेत आणि ३ सामने गमावले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या गुणांची टक्केवारी ६२.५० आहे. न्यूझीलंडनंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळायची आहे.

ऋषभ पंतने मोडला धोनीचा विक्रम
पंतने जलदगतीने २ हजार ५०० धावांचा टप्पा पार करत महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मागे टाकला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने हा पल्ला गाठणारा तो भारतीय विकेट किपर फलंदाज ठरला आहे. ऋषभ पंतने ६२ व्या डावात हा विक्रमी डाव साधला. धोनीने यासाठी ६९ वेळा फलंदाजी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये फक्त ४ विकेट किपर फलंदाज आहेत, ज्यांनी २५०० धावांचा पल्ला पार केला आहे. यात आता पंत अव्वलस्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ या यादीत धोनीचा नंबर लागतो. या दोघांशिवाय फारुख इंजिनीयर आणि सैय्यद किरमानी या दिग्गजांचा समावेश आहे.