सिक्किमविरुद्ध गोव्याची विजयाच्या दिशेने वाटचाल

कृष्णमूर्ती सिद्धार्थ, मंथन खुटकरची दमदार शतके : दिवसअखेर सिक्किम ३ बाद ५०

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
19th October, 11:51 pm
सिक्किमविरुद्ध गोव्याची विजयाच्या दिशेने वाटचाल

पणजी : पहिल्या दिवशी सिक्किमच्या संघाला १०८ धावांत गुंडाळल्यानंतर गोव्याच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजीचे दर्शन घडवला. गोव्याने आपला डाव ४ बाद ३६७ धावांवर घोषित केला. यामध्ये कृष्णमूर्ती सिद्धार्थ, मंथन खुटकरची दमदार शतके, तर रोहन कदम, सुयश प्रभूदेसाई यांनी अर्धशतके झळकावली. गोव्याकडे २०९ धावांची आघाडी असून त्यांना विजयासाठी सिक्किमचे ७ फलंदाज बाद करायचे आहेत.

दुसऱ्या दिवशी गोव्याच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी केली. रोहन कदम आणि सुयश प्रभूदेसाई यांनी पहिल्या गड्यासाठी १०० धावांची भागिदारी रचली. गोव्याला पहिला धक्का सुयशच्या रुपाने बसला. तो ९७ चेंडूत ५४ धावा करून धावचित झाला. १२७ या संघाच्या धावसंख्येवर रोहन पलवतचा शिकार ठरला. त्याने १०६ चेंडूत ५५ धावा केल्या. त्यानंतर कृष्णमूर्ती सिद्धार्थ, मंथन खुटकर यांनी गोव्यासाठी द्विशतकी भागिदारी रचली. कृष्णमूर्ती सिद्धार्थने १७२ चेंडूत नाबाद १३० धावा तर मंथन खुटकरने १९० चेंडूत १०४ धावा केल्या. सिक्किम संंघातर्फे अंकूर मलिक, लि यांग लेप्चा आणि पार्थ पलवत यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. गोव्याने आपला डाव ४ बाद ३६७ धावांवर घोषित केला.
दुसऱ्या डावात सिक्किमची सुरुवात अतिशय खराब झाली. १४ या संघाच्या धावसंख्येवर पंकज रावत (४) तर १८ या धावसंख्येवर नीलेश लामिछाने (८) बाद झाले. दोघांचाही अर्जुन तेंडुलकरने त्रिफळा उडवला. त्यानंतर आलेल्या अन्वेश शर्माला दर्शन मिशाळने पायचित केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सिक्किम संघाच्या ३ बाद ५० धावा झाल्या होत्या. पार्थ पलवत १८ तर अरुण छेत्री ७ धावांवर खेळत आहे. गोव्यातर्फे अर्जुन तेंडुलकरने २ तर दर्शन मिशाळने १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : सिक्किम : पहिला डाव : सर्वबाद १०८, दुसरा डाव : ३ बाद ५०, गोवा : पहिला डाव : ४ बाद ३६७ वर घोषित.