तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची संयमी फलंदाजी

दिवसाअखेर ३ बाद २३१ धावा : कोहली-सर्फराजची १३६ धावांची भागिदारी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
19th October, 12:32 am
तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची संयमी फलंदाजी

बंगळुरू : न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताने दमदार पुनरागमन केले आहे. शुक्रवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाने ३ गडी गमावून २३१ धावा केल्या. भारत सध्या न्यूझीलंडपेक्षा १२५ धावांनी मागे आहे.
सरफराज खान ७० धावा काढून नाबाद परतला. दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर विराट कोहली बाद झाला. त्याला ग्लेन फिलिप्सने यष्टिरक्षक टॉम ब्लंडेलच्या हाती झेलबाद केले.
कोहली ७०, रोहित शर्मा ५२ आणि यशस्वी जैस्वाल ३५ धावा करून बाद झाला. एजाज पटेलने २ आणि ग्लेन फिलिप्सने १ बळी घेतला. कोहली आणि सर्फराज यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी झाली.
न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात ४०२ धावांवर सर्वबाद झाला होता. ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने पहिल्या डावात भारताला ४६ धावांत ऑलआउट केले होते. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नव्हता.
राचिनचे शतक
शुक्रवारी न्यूझीलंडने ३ बाद १८० धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली. २२ धावांवर खेळत असलेल्या राचिन रवींद्रने शतक झळकावले. त्याने १५७ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १३४ धावा केल्या. राचिन एका टोकाकडून धावा काढत राहिला आणि दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत राहिल्या. डॅरिल मिशेल (१८ धावा), टॉम ब्लंडेल (५ धावा), ग्लेन फिलिप्स (१४ धावा) आणि मॅट हेन्री (८ धावा) पहिल्या सत्रात बाद झाले. अशा स्थितीत टीम साऊदीने रचिन रवींद्रसोबत आठव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली.
रवींद्र-साऊदीची शतकी भागीदारी
सुरुवातीच्या षटकांमध्ये ४ गडी बाद झाल्यानंतर टीम साऊदीने राचिन रवींद्रला साथ दिली आणि संघाची धावसंख्या ३७० धावांपर्यंत नेली. या दोघांनी आठव्या गड्यासाठी १३७ धावांची भागीदारी केली. भारतीय मैदानात भारताविरुद्ध ८ गड्यासाठी ही सर्वोच्च भागीदारी आहे. रवींद्र आणि साऊदीने ५० वर्षे जुना विक्रम मोडला.
बंगळुरू कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात २ धावा करणारा भारतीय कसोटी कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या डावात लयीत दिसला आणि त्याने संघासाठी चांगली खेळीही खेळली. तो मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता, पण दुर्दैवाने तो एजाज पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. रोहित शर्माने बाद होण्यापूर्वी अर्धशतक पूर्ण केले. या खेळीच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आठवे स्थान पटकावले आहे. तसेच त्याने विराटच्या साथीने धावा करताना सौरव गांगुली आणि राहुल द्रविडचाही विक्रम मोडला.
रोहित शर्माने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत ६३ चेंडूत ५२ धावा केल्या. यादरम्यान त्याने एक षटकार आणि ८ चौकार लगावले. या खेळीच्या जोरावर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर कोहलीबरोबर भागीदारी करत गांगुली-द्रविडचाही विक्रम मोडला. त्याचबरोबर रोहितने तमिम इक्बाललाही मागे टाकले.

रोहित शर्माने तमिम इक्बालला टाकले मागे
रोहित शर्माने बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात ५२ धावा केल्या आणि आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आला आहे. त्याने या क्रमांकावर असलेल्या तमीम इक्बालला मागे टाकले आणि आता तो नवव्या स्थानावर घसरला आहे. सलामीवीर म्हणून रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३६० डावांमध्ये १५२१४ धावा केल्या आहेत, तर तमिम इक्बालने ४५१ डावांमध्ये १५२१० धावा केल्या आहेत.
विराट कोहली तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १०२ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ७० धावा करत बाद झाला. त्याने या अर्धशतकी खेळीत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. कोहलीने ५३ धावा पूर्ण करताच कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावा पूर्ण केल्या. कसोटीत ९००० धावा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज आहे. कोहलीपूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांनी ही मोठी कामगिरी केली होती. त्याचबरोबर सर्वात जलद ९ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा चौथा भारतीय फलंदाज आहे. १९७ डावात त्याने ही विशेष कामगिरी आपल्या नावे केली आहे. 

कोहलीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम
या अर्धशतकी खेळीत विराट कोहलीने एक मोठा विक्रमही केला आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना १५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा आणि भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने राहुल द्रविडला मागे टाकले आणि तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने या बाबतीत राहुल द्रविडला मागे टाकले आहे.


कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज 

१५९२१ – सचिन तेंडुलकर (५३.७८ सरासरी)
१३२८८ – राहुल द्रविड (५२.३१ सरासरी)
१०१२२ – सुनील गावस्कर (५१.१२ सरासरी)
९००* – विराट कोहली (४८.९० सरासरी)
८५८६ – वीरेंद्र सेहवाग (४९.३४ सरासरी)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :

२२८६९ – रिकी पाँटिंग (५४०)
२२०११ – कुमार संगकारा (४६८)
१५६९६ – केन विल्यमसन (३३७)
१५००९ – विराट कोहली (३१६)*
१४५५५ – राहुल द्रविड (३२९)
११२३६ – जॅक कॅलिस (२८३)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे सलामीवीर
१९२९८ धावा – सनथ जयसूर्या (५६३)
१८८६७ धावा – ख्रिस गेल (५०६)
१८७४४ धावा – डेव्हिड वॉर्नर (४६२)
१६९५० धावा – ग्रॅम स्मिथ (४२१)
१६१२० धावा – डेस्मन हेन्स (४३८)
१६११९ धावा – वीरेंद्र सेहवाग (४००)
१५३३५ धावा – सचिन तेंडुलकर (३४२)
१५२१४ धावा – रोहित शर्मा (३६०)
१५२१० धावा – तमिम इक्बाल (४५१)
रोहित-कोहलीने द्रविड-गांगुलीला टाकले मागे
बंगळुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी २३ धावांची भागीदारी झाली आणि त्यानंतर हिटमॅन बाद झाला. पण या भागीदारीच्या जोरावर या दोघांनी राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांचा भागीदारीचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांची भागीदारी करणारी रोहित-कोहली ही भारताची तिसरी जोडी ठरली आहे. या दोघांनी मिळून ७६२९ धावा केल्या आहेत, तर गांगुली आणि द्रविडने ७६२६ धावांची भागीदारी केली होती. या यादीत गांगुली आणि सचिन १२४०० धावांच्या भागीदारीसह पहिल्या क्रमांकावर आहेत.
भारतासाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करणारे खेळाडू
१२४०० धावा – गांगुली/सचिन
११०३७ धावा – द्रविड/सचिन
७६२९ धावा – रोहित/कोहली
७६२६ धावा – गांगुली/द्रविड
७१९९ धावा – गंभीर/सेहवाग