मेजर मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत यास्मिन सय्यदला दुहेरी किताब

राहुल, आरोही, फ्लॉयड, फ्रेड्रिक, आर्यमान, सिनोव्हिया यांचेही विजय

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th October, 10:03 pm
मेजर मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत यास्मिन सय्यदला दुहेरी किताब

पणजी : स्व. मनोहर धोंड स्मृती राज्य मेजर मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत यास्मिन सय्यदने दुहेरी किताब पटकावला. याशिवाय राहुल देसवाल, आरोही कवठणकर, फ्लॉयड आराउजो, फ्रेड्रिक फर्नांडिस, आर्यमान सराफ व सिनोव्हिया डिसोझा यांनीही आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.

ही राज्य मेजर मानांकन बॅडमिंटन स्पर्धा धोंड स्पोर्ट्स क्लब, इव्हिनिंग बॅडमिंटन ग्रुप आणि पणजी क्रीडा संकुल यांनी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने इनडोअर मैदान, कांपाल-पणजी येथे आयोजित केली होती.

पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत अव्वल मानांकित राहुल देसवालने निशांत शेनईवर २१-१७, २१-९ असा विजय मिळवून किताब पटकावला. आरोही कवठणकरने अव्वल मानांकित सुफिया शेखचा १९-२१, २१-१८, २१-१९ असा तीन सेटच्या चुरशीच्या लढतीत पराभव करून महिला एकेरीत विजेतेपद पटकावले.

पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत फ्लॉइड आराउजो आणि फ्रेड्रिक फर्नांडिस यांनी अव्वल मानांकित आर्यमन सराफ आणि सूरज लामा यांचा २१-१८, १०-२१, २१-१८ असा तीन सेटरने पराभव करून विजेतेपद पटकावले.

महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत यास्मिन सईद आणि सिनोव्हिया डिसोझा यांनी शिवांजली थिटे आणि सुफिया शेख या अव्वल मानांकित जोडीवर २१-१३, २४-२२ असा संघर्षपूर्ण लढतीत मात केली. यास्मिन सईदने मिश्र दुहेरीत तिची विजयी घोडदौड सुरू ठेवत आर्यमन सराफसोबत भागीदारी करत राहुल देसवाल आणि मलायका लोबो यांचा २१-१९, २१-१३ असा पराभव करत स्पर्धेतील तिचे दुसरे विजेतेपद मिळवले.

कुंभारजुवाचे आमदार राजेश फळदेसाई, हर्षद धोंड (धोंड स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष) आणि माजी क्रिकेटपटू आंबे पर्वतकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. मनोज पाटील (अध्यक्ष), प्रवीण शेणॉय (सचिव), संजय भोबे (खजिनदार), संदीप हेबळे (संघटन सचिव), विनायक कामत (मुख्य पंच), नरहर ठाकूर, दिनेश पै, नवनीत नासनोडकर यांच्यासह गोवा बॅडमिंटन संघटनेचे (जीबीए) अधिकारीही यावेळी उपस्थित होते.