बाबरसह तीन स्टार खेळाडूंना संघातून वगळले

इंग्लंडविरुद्ध उर्वरित दोन कसोटीतून खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
14th October, 12:38 am
बाबरसह तीन स्टार खेळाडूंना संघातून वगळले

इस्लामाबाद : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. सततच्या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे त्याने मोठा निर्णय घेत इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांतून तीन स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
दरम्यान, वगळण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी, सर्फराज खान आणि नसीम शाह यांच्या नावांचा समावेश आहे. हे खेळाडू बऱ्याच काळापासून खराब फॉर्ममधून जात आहेत, मात्र, बाबर आझमसारख्या मोठ्या स्टारला वगळणे हा पाकिस्तानी चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे.
पहिल्या कसोटीत लाजिरवाणा पराभव
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ५५६ धावा केल्या. यानंतर इंग्लंड संघाने ७ गडी गमावून ८२३ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने डाव घोषित केला. यानंतर पाकिस्तानचा संघ फलंदाजीला आला आणि त्यांचा संघ अवघ्या २२० धावांवर सर्वबाद झाला. यासह, सामन्याच्या पहिल्या डावात ५५० पेक्षा अधिक धावा केल्यानंतरही पराभवाचा सामना करणारा पाकिस्तान कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला संघ ठरला.
इंग्लंडविरुद्ध निवडलेला पाकिस्तानचा संघ
शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसीबुल्ला (विकेटकीपर), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), नोमान अली, सईम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा आणि जाहिद मेहमूद.
नवीन खेळाडूंना मिळाली संधी
बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि सरफराज खान यांना वगळण्याच्या कारणाबाबत पीसीबीने कोणतीही माहिती दिलेली नाही. या चार खेळाडूंच्या जागी त्याने हसीबुल्लाह, मेहरान मुमताज, कामरान गुलाम, वेगवान गोलंदाज मोहम्मद अली आणि ऑफस्पिनर साजिद खान यांचा समावेश केला आहे. सुरुवातीला मूळ पहिल्या कसोटी संघाचा भाग असलेले पण नंतर सोडण्यात आलेले नोमान अली आणि जाहिद महमूद यांचाही १६ खेळाडूंच्या संघात समावेश करण्यात आला आहे.            

हेही वाचा