न्यूझीलंडविरुद्ध घरच्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी भारत सज्ज

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
15th October, 12:23 am
न्यूझीलंडविरुद्ध घरच्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात

बंगळुरू : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या गुणतालिकेत भारत सध्या अव्वल आहे. या मोसमात भारताला आता फक्त दोनच मालिका खेळायच्या असून टीम इंडिया अंतिम सामना खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अलीकडेच, भारताने बांगलादेशचा २-० असा क्लीन स्वीप करून मोठी कामगिरी केली आणि आता रोहित ब्रिगेड न्यूझीलंडविरुद्ध घरच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका १६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. दुसरा कसोटी सामना २४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आणि शेवटचा म्हणजेच तिसरा कसोटी सामना १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका ही जवळपास तीच टीम आहे जी अलीकडेच बांगलादेशविरुद्ध खेळली होती. केवळ यश दयालला संघातून वगळण्यात आले आहे. तर हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मयंक यादव आणि प्रसीध कृष्णा यांना राखीव खेळाडू म्हणून संधी मिळाली आहे.
........
भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
१६ ते २० ऑक्टोबर : पहिली कसोटी, बंगळुरू
२४ ते २८ ऑक्टोबर : दुसरी कसोटी, पुणे
१ ते ५ नोव्हेंबर : तिसरी कसोटी, मुंबई
........
दोन्ही संभाव्य संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.
प्रवास राखीव: हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मयंक यादव आणि प्रसीध कृष्णा.
न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (फक्त पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ'रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स, इश सोधी (केवळ दुसरी आणि तिसरी कसोटी), टीम साऊथी, केन विल्यमसन आणि विल यंग.