वयलेभाट-मेरशी येथे पार्क केलेल्या जीपमध्ये सापडला वृद्धाचा मृतदेह

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
9 hours ago
वयलेभाट-मेरशी येथे पार्क केलेल्या जीपमध्ये सापडला वृद्धाचा मृतदेह

पणजी : वयलेभाट-मेरशी येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या जीपमध्ये गुरुवारी सायंकाळी मृतदेह सापडला. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, सदर मृतदेह भोम येथील गजानन गावडे (६०) यांचा असल्याचे समोर आले. या प्रकरणी प्राथमिक चौकशी कोणताही घातपात नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट करून अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.

जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वयलेभाट-मेरशी येथील एका गॅरेजमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मालकाने जीप दिली होती. जीप दुरुस्त करून रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवली होती. मालकाने फोन करून जीप नेण्यासाठी येणार असल्याची गॅरेज मालकाला दिली. त्यानुसार गॅरेजच्या कर्मचाऱ्यांनी जीपची अंतिम पाहणी करण्यासाठी दरवाजा उघडला, तर त्यात एका व्यक्तीचा मृतदेह असल्याचे समोर आले. त्यानंतर याबाबतची माहिती जुने गोवा पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी मृतदेह त्या ठिकाणी अनेक दिवसांपासून असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला असता, त्यात कोणताही घातपात नसल्याचे समोर आल्यानंतर मृतदेह बांबोळी येथील गोमेकाॅच्या शवागारात पाठविला.

याचदरम्यान परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती पसरली. मेरशी येथील एका दुकानात काम करणाऱ्या भोम येथील गजानन गावडे यांचा ताे मृतदेह असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर या प्रकरणी त्यांच्या नातवाईकांशी संपर्क साधून मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा