बार्देश: हणजूण येथे केरळी पर्यटकाकडून २.४० लाखांचे ड्रग्ज जप्त

गोव्यात पहिल्यांदाच डीएमटी प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
17th October, 12:00 am
बार्देश:  हणजूण येथे केरळी पर्यटकाकडून २.४० लाखांचे ड्रग्ज जप्त

पणजी : गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) मंगळवारी १५ रोजी रात्री हणजूण येथील जर्मन बेकरी जवळ छापा टाकून धीरज मॅथ्यू (३०) या केरळीयन युवकाला अटक केली. 

त्याच्याकडून २ लाख ४० हजार ५०० रुपये किमतीचे ३.५ ग्रॅम डायमेथिलट्रिप्टामाइन (डीएमटी), २० ग्रॅम चरस आणि २० ग्रॅम कोकेन हे विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त केले. गोव्यात पहिल्यांदाच डीएमटी प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, हणजूण येथील जर्मन बेकरी जवळ कॅफे मॅन्गोच्या बाहेर एक युवक ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती एएनसीच्या अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार, अधीक्षक टिकम सिंग वर्मा आणि उपअधीक्षक नेर्लन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजित पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक दीनदयाळनाथ रेडकर, साहाय्यक उपनिरीक्षक वासुदेव नाईक, हवालदार प्रमोद कळंगुटकर, कॉन्स्टेबल सदानंद मळीक, योगेश मडगावकर, कुंदन पटेकर व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी १५ रोजी रात्री ११.५० ते बुधवारी पहाटे ३.२० दरम्यान संबंधित ठिकाणी सापळा रचला. 

याच दरम्यान गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार, एक युवक त्या ठिकाणी आला असता, त्याची चौकशी केली. पथकाने धीरज मॅथ्यू (३०) या युवकाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून २ लाख ४० हजार ५०० रुपये किमतीचे ३.५ ग्रॅम डायमेथिलट्रिप्टामाइन (डीएमटी), २० ग्रॅम चरस आणि २० ग्रॅम कोकेन हे विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त केला. 

डीएमटी हा प्रकारचे ड्रग्ज गोव्यात पहिल्यांदा जप्त केले आहे. त्यानंतर महिला उपनिरीक्षक प्रियंका सावंत यांनी संशयिताविरोधात २०(बी) (ii) (बी),२२(बी) आणि २२(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.              

हेही वाचा