क्लब मालकांनी कायदा हातात घेऊ नये!

पोलीस अधीक्षकांची सूचना : कळंगुट पोलीस आणि क्लब मालक समन्वय बैठक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th October, 12:20 am
क्लब मालकांनी कायदा हातात घेऊ नये!

म्हापसा : पर्यटकांशी गैरवर्तन किंवा कायदा हातात घेण्याचा तसेच नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करू नका, अशा सल्लावजा सूचना पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी कळंगुट-कांदोळीतील क्लब मालकांना केली.

गेल्या आठवड्यात कळंगुटमध्ये काही हिंसक तसेच पर्यटकांना मारहाणीच्या घटना घडल्या होत्या. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर बुधवार, १६ रोजी संध्याकाळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी कळंगुट पोलीस स्थानक हद्दीतील मुख्य क्लब मालकांसोबत समन्वय बैठक घेतली. या बैठकीत बागा येथील टिटोस लेनसह सुमारे २० क्लब मालकांनी सहभाग घेतला. पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे व निरीक्षक राहुल परब यावेळी उपस्थित होते.

आस्थापनात येऊन कोणी धुडगूस घालत असल्यास, पोलिसांशी संपर्क साधा, कायदा हातात घेऊ नये, नवीन पर्यटन हंगामात पर्यटक अनुकूल धोरणावर भर असेल. जेणेकरुन पर्यटकांना गोवा हे पर्यटन स्थळ सुरक्षित वाटावे व माघारी जाताना त्यांनी चांगल्या स्मृती घेऊन परतावे. आपल्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी करावी, अशा सूचना अधीक्षक कौशल यांनी क्लब मालकांना यावेळी केल्या.

अधीक्षक अक्षत कौशल म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत पर्यटकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने क्लबना येत असलेल्या समस्यांवर चर्चा झाली. पोलीस आणि क्लब मालकांसोबत समन्वय असावा. जेणेकरुन यापुढे कोणतीय घटना घडू नये. क्लब आणि रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराची योग्य पोलीस पडताळणी करून घ्यावी, कोणत्याही कर्मचाऱ्याने कायदा हातात घेऊ नये. कोणी त्रास देत असल्यास किंवा व्यवसायाला आडकाठी आणत असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. पोलिसांकडून उल्लंघनकर्त्यांवर योग्य व कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन आम्ही या व्यावसायिकांना दिल्याचे अधीक्षक कौशल यांनी सांगितले. ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यास क्लब मालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.

रात्रीच्या वेळी नाकाबंदी : कौशल

पोलीस गस्तीसाठी विशेष योजना आखली आहे. गुन्हेगारीचे हॉटस्पॉट आहेत, तिथे पोलिसांची उपस्थिती वाढवली आहे. शिवाय अतिरिक्त राखीव दल पोलीस कर्मचाऱ्यांचा वापर केला जात आहे. रात्रीच्या वेळी नाकाबंदी देखील केली जात आहे, असे अधीक्षक कौशल यांनी सांगितले. 

हेही वाचा