सीसीटीव्हीचा ‘डीव्हीआर’ सादर करण्याचा शॅक मालकाला आदेश

पोलिसांकडून नोटीस : कांदोळीत डॉक्टरांना मारहाण प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th October, 12:16 am
सीसीटीव्हीचा ‘डीव्हीआर’ सादर करण्याचा शॅक मालकाला आदेश

म्हापसा : कांदोळी समुद्रकिनारी कांपाल - पणजीमधील तीन पशुवैद्यकीय डॉक्टरांना क्षुल्लक कारणास्तव मारहाण झाली होती. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी ‘गोवन हट’च्या मालकाला शॅकमधील सीसीटीव्हीचा डिव्हीआर सादर करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच याप्रकरणी शॅकचे मालक आम्हालाच दोषी ठरवून चुकीची व बनावट माहिती पसरवत असल्याचा दावा पीडित डॉक्टरांनी केला आहे.

शुक्रवारी मध्यरात्री १२ वा. च्या सुमारास ही घटना घटना घडली होती. फिर्यादी डॉ. पार्वती जोशी यांच्यासह डॉ. राहुल चौधरी व डॉ. नरेंद्र सिंग फेनिन या तिघांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी शनिवारी पोलिसांनी शॅकचे मालक आणि कामगारांविरुद्ध गुन्हा नोंद करून संशयित जितेंद्र सिंग (२४, उत्तराखंड) व अरूणकुमार विश्वकर्मा (२५, उत्तरप्रदेश) या दोघांना अटक केली होती.

सदर शॅकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे होते. त्यामुळे हे नेमके प्रकरण जाणून घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआर पोलीस स्थानकात सादर करावा, अशी नोटीस पोलिसांनी संबंधित शॅकच्या मालकांना बजावली आहे.

दरम्यान, पोलिसांच्या सूचनेनुसार पीडित डॉक्टरांनी घटनेच्या दिवशी परिधान केलेले कपडे चौकशी अधिकार्‍यांकडे सादर केले आहेत.

आम्ही घटनास्थळी पोलिसांसमवेत गेलो होतो. तिथे शॅक चालू होते व लोक दारू प्राशन करत होते. आम्ही जर दारूच्या नशेत होतो तर उपचारातून तसा कोणताही अहवाल आलेला नाही. क्षुल्लक कारणावरुन शॅकच्या ७-८ जणांच्या कामगार टोळक्याने आमच्यावर हल्ला केला. आम्ही रक्तबंबाळ अवस्थेत सहकार्‍यांना बोलावून घेतले व नंतर इस्पितळात उपचार घेतले. तसेच पोलीस तक्रार केली.

हा घडलेला प्रकार शॅकमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये बंदीस्त झालेला आहे. पोलिसांनी अद्याप सीसीटीव्ही फुटेज घेतलेली नाही. ती तत्काळ ताब्यात घ्यावी व सत्य समोर आणावे, अशी मागणी पीडित डॉक्टरांनी केली आहे.

संशयित महिलेचा दावा बनावट व चुकीचा

आम्ही मद्यधुंद नशेत होतो व आम्हीच एकमेकांना मारहाण केली, आपल्या बांधकाम सुरू असलेल्या शॅकची मोडतोड केली, तसेच उपचारार्थ इस्पितळात जाण्यास नकार दिला, हा संशयित महिलेने केलेला दावा बनावट व चुकीचा असल्याचा आरोप पीडित डॉक्टरांनी केला आहे.

मारहाण केलेल्या केवळ दोघांनाच अटक

मारहाण केलेल्यांपैकी फक्त दोघांनाच अटक झालेली आहे. इतरांना अद्याप का अटक झाली नाही? अटक झालेले ते याच प्रकरणाशी निगडित आहेत का? हे अजूनही पोलिसांनी आम्हाला सांगितले नाही. व्हिडिओमध्ये महिला बोलत होत्या, त्या देखील या प्रकरणात सहभागी होत्या, असा दावाही पीडित डॉक्टरांनी केला आहे. 

हेही वाचा