रॅपर अवी ब्रागांझाला न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण : लुटआऊट नोटीसही केलेली जारी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th October, 12:24 am
रॅपर अवी ब्रागांझाला न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

मडगाव : सुरावली येथील अविनाश जॉन ब्रागांझा याने व्हिडिओ काढत धार्मिक भावना दुखावल्या होत्या. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी चिथावणीखोर वक्तव्ये करणे, धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणे तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद करत लुक आऊट नोटीस जारी केली होती. याप्रकरणी त्याने मडगाव न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केलेला होता. पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे आदेश देत ब्रागांझा याला न्यायालयाकडून अंतरिम दिलासा देण्यात आला आहे.

गोवन पॉप सर्कलमध्ये नावाजलेले नाव असलेल्या बाब अवी ब्रागांझा याच्याविरोधात कुंकळ्ळी पोलिसांकडून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद केलेला आहे. अवी ब्रागांझा याने एका व्हिडिओत हिंदू धर्माचा अनादर होईल अशी वक्तव्ये केली होती. समाजमाध्यमांव्दारे चुकीची माहिती पसरवत दोन धर्मातील लोकांत तेढ निर्माण करणे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात हिंसक वक्तव्ये केलेली होती. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलीस सुरावली येथील अविनाश ब्रागांझा याच्या घराकडे त्याला शोधण्यासाठी गेले असता तो सापडून न आल्याने नोटीस त्याच्या दरवाजावर चिकटवली होती. याप्रकरणी ब्रागांझा याने मडगाव जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. संशयिताच्या वकिलांनी सदर व्हिडिओ हा जुलै २०२१ मध्ये जारी करण्यात आलेला होता. त्यानंतर स्वत:चा सदर व्हिडिओ सर्व समाजमाध्यमांवरुनही हटवलेला होता. त्याबाबत आता अटकेची आवश्यकता असू नये तसेच तपासात सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही दिली. याप्रकरणी न्यायालयाकडून पुढील सुनावणी १८ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत संशयित ब्रागांझा याला अटक करू नये, असे आदेश देत संशयित ब्रागांझा याला अंतरिम दिलासा दिलेला आहे. 

हेही वाचा