'चर्चेची वार्ता': पर्यटकांसह स्थानिकांनी संयम बाळगावा; गाेव्याची प्रतिमा बदलणे गरजेचे!

'चर्चेची वार्ता'मध्ये अभिप्राय- पर्यटन व्यवसाय वाढला तर आर्थिक वृद्धी, मात्र कायदा हातात घेणे चुकीचे

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
9 hours ago
'चर्चेची वार्ता': पर्यटकांसह स्थानिकांनी संयम बाळगावा; गाेव्याची प्रतिमा बदलणे गरजेचे!

पणजी : गोव्याला बदनाम करणारी पर्यटकांना होणारी मारहाण रोखण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत? असा प्रश्न दै. गोवन वार्ताच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 'चर्चेची वार्ता' या सदरात विचारण्यात आला होता. यावर वाचकांनी आपल्या संमिश्र प्रतिक्रिया मांडल्या आहेत. काही वाचकांनी येणाऱ्या पर्यटकांची बाजू मांडत असे म्हटले आहे की, पर्यटकांना आदराने वागवणे गरजेचे आहे. स्थानिक आउटलेट/शॅक यांनी पर्यटकांबाबत फसवणूक, धमकावणे, गैरवर्तन करणे असे प्रकार आढळल्यास ही दुकाने हंगामासाठी त्वरित सील करणे आवश्यक आहे. तर काही वाचकांनी पब, बार, डान्सबार बंद करत पोलीस विभागाने गुन्हेगारी प्रवृत्ती बद्दल कडक पाऊले उचलावीत असे आवाहन केले आहे. यातील काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया


• क्षुल्लक कारणावरून पर्यटकांना मारहाण होत असेल तर ती पर्यटनासाठी चिंता वाढवणारी गोष्ट आहे. पर्यटक चुकीचे वागले तर कायदा हातात घेऊन त्यांना शिक्षा करणे हा अयोग्य मार्ग आहे. गोव्यात अशा घटना घडल्या तर शासनाने तातडीने कारवाई करून त्या आस्थापनांचे परवाने रद्द करावे. तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गोवा पोलिसांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.-- राजेंद्र पेडणेकर 

• पर्यटकांना आदराने वागवणे गरजेचे आहे. गोव्याची प्रतिमा खराब होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. पर्यटन व्यवसाय फोफावला तर, आमच्या आर्थिक वृद्धीला वाव मिळेल. कामधंदा वाढेल, म्हणजे सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळू शकेल, धंदा तेजीत येईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. पर्यटक गैर वागले तर त्याच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे. - शांबा तुयेकर


• पर्यटकांवर वारंवार होत असलेली मारहाण रोखण्यासाठी कडक नियम बनवायलाच हवे. आणि त्यासाठी पर्यटन स्थळांच्या जागी जास्त पोलीस ठेवण्यात यावेत. पर्यटकांच्या मनात गोव्याबद्दल जी भावना आहे ती काढून टाकावी लागेल. दिवसाढवळ्या रस्त्यावर दारू पिणे, रस्त्यावर पाहिजे तशी गाडी चालवणे, रात्री नाईट क्लबमध्ये धिंगाणा घालणे या पर्यटकांच्या समजुती बदलण्याची गरज आहे. - अमीर बेळेकर

• गोव्यातील तथाकथित ड्रग्ज आणि वेश्याव्यवसाय बंद झाला पाहिजे. अतोनात आर्थिक उलाढाल असल्याने राजकारणी, पोलीस, व्यावसायिक व दलाल ह्यांच्यामुळे उत्तर गोव्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. राजकारण्यांनी स्वार्थ बाजूला ठेवून कडक कारवाई केली पाहिजे.- राजू पारकर

• पोलीस विभागाने रात्री ११ नंतर रात्रीचे पेट्रोलिंग राखणे आवश्यक आहे. सरकारी नियमानुसार रात्रीचे पब, बार, डान्सबार बंद करावेत. सहा नंतर समुद्रकिनारी एजंट, गाईड यांना परवानगी देऊ नये. हा नियम संपूर्ण गोव्यात पाळावा. - आनंद खांडेपारकर


• गाेव्यात या आणि हवं तसं वागा ही जी गाेव्याची प्रतिमा झाली आहे, त्यामुळे खरा गाेवा काय आहे हे देशभरात रुजवण गरजेचे आहे! गाेव्यात जाऊन बेधुंद झाल्यावर शिस्त रहात नाही. म्हणून अशा घटना घडत आहेत! - नील सुखटणकर


• पर्यटन उद्योगातून बाहेर पडून इतर सॉफ्टवेअर आणि संबंधित उद्योगांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पर्यटनाचा ७०% नफा राज्याबाहेरच्या जनतेला जातो हे खरे आहे.- गिरिश महाले 



• गुन्हेगारी प्रवृत्तीचे पर्यटक आणि त्यांच्या सोबत असलेले कुटुंब/मित्र/सोबती यांना कायदेशीररित्या ताब्यात घेतले पाहिजे आणि गोवा सोडण्यास भाग पाडले पाहिजे. पर्यटकांनी स्थानिक परंपरेचा गैरवापर केला असेल किंवा महिलांशी गैरवर्तन केले असेल किंवा समुद्रकिनाऱ्यावर गाडी चालवताना आढळल्यास त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी. तसेच कोणत्याही स्थानिक व्यावसायिकांकडून पर्यटकांची फसवणूक, धमकावणे किंवा गैरवर्तन करताना आढळल्यास, ही दुकाने हंगामासाठी त्वरित सील करणे आवश्यक आहे. - संजीव सरदेसाई



• गोव्याला बदनाम करणारी व पर्यटकांना मारहाण होणारी प्रकरणे रोखण्यासाठी गोवा प्रशासनाने काही महत्त्वपूर्ण उपाययोजना राबवायला हव्यात. कायदा व सुव्यवस्था कडक करणे, ट्रेनिंग क्लब आणि हॉटेल्समध्ये बाऊन्सर्सना योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तसेच पर्यटकांसाठी २४x७ हेल्पलाइन सुरू करणे, पर्यटकांना स्थानिक नियम, सांस्कृतिक प्रथा याबद्दल जागरूक करणे; पर्यटन क्षेत्रात देखरेख समित्या स्थापन करणे; या उपाययोजनांमुळे गोव्यातील पर्यटन अधिक सुरक्षित आणि गोव्याची प्रतिमा सुधारणे शक्य होईल.- विजय देव 



• खरं तर या प्रकाराला दोन्ही बाजू जबाबदार आहेत. नेहमीच स्थानिक चुकीचे असतात असे नाही. येणारे पर्यटक सुद्धा धांगडधिंगा आणि दादागिरी करतात. त्यात बऱ्याच वेळा गोव्यात राहणाऱ्या त्यांच्या मित्राचा किंवा नातेवाईकांच्या ओळखीचा गैरवापर पर्यटकांकडून केला जातो किंवा आर्थिक वापर करून प्रशासनाचा वापर केला जातो. त्यामुळे हा प्रश्न सुटणे हे कठीण काम आहे.- प्रवीण गावकर

• गोमंतकीयानी प्रथम भारतीयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. परप्रांतीयांवर हात उगारला तर तो काहीही करणार नाही असा गोड समज आहे.- लक्ष्मण शेटये            

हेही वाचा