सासष्टी : समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ, किनाऱ्यावरील शॅक्समध्ये घुसले पाणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th October, 02:31 pm
सासष्टी : समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ, किनाऱ्यावरील शॅक्समध्ये घुसले पाणी

मडगाव : राज्यात सुरू झालेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे भरतीच्यावेळी समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. याचा फटका समुद्र किनार्‍यालगत उभारण्यात आलेल्या शॅक्सना बसला. शॅक्समध्ये पाणी गेल्याने शॅक्समालकांचे  नुकसान झाले.


 राज्यातील पर्यटन हंगामाला सुरुवात होणार असल्याने यावर्षी पर्यटन खात्याकडून हंगामाआधीच शॅक्स उभारणीसाठीच्या परवाना देण्याची प्रक्रिया पार पाडली व त्यामुळे किनारपट्टी भागातील शॅक्स मालकांना शॅक्स उभारणी वेळेत करता आली. मान्सून देशभरातून माघारी परतला असला तरीही आग्नेय दिशेकडून येणार्‍या वार्‍यांमुळे पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात येत असल्याने नागरिकांकडूनही सतर्कता बाळगली जात आहे. 


मात्र बुधवारी सायंकाळपासून राज्यभरात पावसाने मुसळधार बरसायला सुरुवात केली. पौर्णिमा असल्याने समुद्राला भरती येते त्यातच पावसाचे वाढलेले प्रमाण यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बाणावली, माजोर्डा, उत्तोर्डा, सेर्नाभाटी किनारपट्टी भागात किनार्‍यावर पाणी नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात वाढले. परिणामस्वरूप किनारी भागात उभारण्यात आलेल्या शॅक्समध्ये पाणी घुसले. यामुळे येथील बेड, खुर्च्या व इतर सामानाचे काही प्रमाणात  नुकसान झाले. काहीठिकाणी शॅक्स पडण्याच्या घटना घडल्या. मात्र पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगल्याने मोठे नुकसान झाले नाही, असे शॅक्समालक कामिलो कार्दोज यांनी सांगितले.

हेही वाचा