बेळगाव : गोवा-बेळगाव महामार्गावर अवजड वाहतुकीमुळे रस्त्याचे वाजले 'तीन तेरा'

रामनगर ते अनमोड या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे धोक्यास आमंत्रण देण्यासारखे आहे. तरीही प्राधिकरणाचे याकडे लक्ष काही केल्या जात नसल्याने स्थानिक तसेच येथून जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
17th October, 03:16 pm
बेळगाव : गोवा-बेळगाव महामार्गावर अवजड वाहतुकीमुळे रस्त्याचे वाजले 'तीन तेरा'

जोयडा : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गांवर रामनगर ते अनमोड मार्गांवर सुरु केलेल्या अवजड वाहतूकीमुळे रस्त्याचे तीन तेरा वाजले आहेत. रामनगर जवळील अस्तोली ब्रिज शेजारी पावसामुळे पुन्हा रस्ता चिखलमय झाल्याने वाहने अडकून पडू लागल्याने बुधवार पासून हा रस्ता वाहतूकसाठी बंद झाला आहे. मात्र रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे मोबाईल स्विच्ड ऑफ येत असून जिल्हा प्रशासनानेही याकडे कानाडोळा केलेला आहे.

अस्तोली ब्रिजच्या बाजूला असलेल्या सुमारे ३०० मिटर रस्त्यावरुन अवजड वाहने जात असल्याने दुर्दशा झाली आहे. हा रस्ता पूर्णतः चिखलमय झाला असल्याने येथे वाहने वारंवार अडकून पडतात. बुधवार पासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने येथे पुन्हा वाहतूक खोळंबली. त्यामुळे आता रस्ता वाहतूकीस बंद झाला असून त्याचा मोठा फटका स्थानिकांनाही बसला आहे. 

या मार्गावर असलेल्या तीनईघाट, बरडकोट, जळकट्टी, अखेती, अनमोड आदी भागात जाणाऱ्या बसेस सध्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी, स्थानिक लोकांचे हाल झाले आहेत. अस्तोली येथे राष्ट्रीय महामार्ग ब्लॉक झाल्याने गोव्यात ये-जा करणाऱ्या बसेस, हलकी चारचाकी वाहने जगलबेट - असू - केसलरॉक - अनमोड या  पर्यायी  मार्गाचा अवलंब करीत असल्याने या रस्त्यावरही वाहतूक कोंडी पाहण्यास मिळत आहे. चांदवाडी क्रॉसपासून केसलरॉक क्रॉसपर्यंत हा रस्ता लहान आहे तसेच येथे मोठमोठे खड्डे पडल्याने येथून जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. 

हेही वाचा