गोवा: विकसित भारत २०४७ मध्ये गोव्याचेही योगदान असेल: मुख्यमंत्री

एनडीएच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत चंदीगडमध्ये

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 hours ago
गोवा: विकसित भारत २०४७ मध्ये गोव्याचेही योगदान असेल: मुख्यमंत्री

पणजी : २०४७ पर्यंत विकसित भारताची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गोवा महत्त्वपूर्ण योगदान देईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. एनडीएच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत ते बोलत होते. 

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मुख्यमंत्र्यांची परिषद बोलावली आहे. यासाठीमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गुरूवारी चंदीगडला गेले आहेत. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती होती. 

उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर राज्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या परिषदेला हजेरी लावली होती. 

पर्यटन, संस्कृती, उद्योग आणि नवनिर्मितीमध्ये गोवा देशासाठी महत्त्वाचे योगदान देत आहे. आत्मनिर्भर भारतासाठी गोवा नेहमीच काम करेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले, त्यानंतर २०१९ मध्ये ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळल्याने ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. 

तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्र्यांची परिषद होत आहे. आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर या परिषदेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा ठराव परिषदेत मंजूर करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ठराव मांडला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ठरावाला अनुमोदन दिले. 

हेही वाचा