म्हापसा : भाजीविक्रेत्याकडून पालिका कर्मचार्‍यांना मारहाणीचा प्रयत्न; पोलिसांत तक्रार

तणावाची स्थिती निर्माण झाल्याने बाजारातील तसेच शहरातील कचरा संकलन काही काळ ठप्प झाले होते.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
17th October, 04:44 pm
म्हापसा : भाजीविक्रेत्याकडून पालिका कर्मचार्‍यांना मारहाणीचा प्रयत्न;  पोलिसांत तक्रार

म्हापसा :  येथील बाजारपेठेत कचऱ्याचे संकलन व वर्गीकरण करताना मिश्रीत कचरा टाकून पालिका कर्मचार्‍यांना मारहाण करण्याचा प्ऱयत्न एका भाजी विक्रेत्यांने केला. या प्रकरणी पालिका कर्मचार्‍यांनी म्हापसा पोलिसांत संशयित सादीक हुलगेरी या भाजी विक्रेत्याविरूध्द तक्रार नोंदवली आहे. सर्व पालिका कर्मचारी पोलीस स्थानकात जमा झाल्याने काही वेळ शहरातील कचरा संकलनाचे काम ठप्प झाले होते.  

 ही घटना गुरूवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. म्हापसा भाजी मार्केटच्या शेजारी गोळा करण्यात आलेल्या कचर्‍याचे पालिका कर्मचारी वर्गीकरण करत होते. यावेळी संशयित सादीक हुलगेरी या भाजी विक्रेत्याने तिथे आणून मिश्रीत कचरा टाकला. हा कचरा फिर्यादी धुडाप्पा नेसरकर व विश्वनाथ बिरवाडकर या पालिका कामगारांच्या हातावर पडला. 

त्यामुळे त्यांनी संशयिताला जाब विचारला व टाकलेला कचरा वेगळा करण्याची सूचना केली. त्यावर संशयिताने या कामगारांशी हुज्जत घातली. तसेच फिर्यादी धुडाप्पा नेसरकर याच्यावर भाजीच्या ट्रेने तर विश्वनाथ बिरवाडकर याच्यावर फावड्याने हल्ला करण्याचा प्ऱयत्न केला. हा हल्ला अन्य कामगारांनी थोपवला. त्यानंतर या भाजीविक्रेत्याने महेश पिरणकर, शेखर दुपदाळे, विश्वास पवार, नामदेव कांबळी या पालिका कर्मचार्‍यांना शिवीगाळ केली.  पालिका कामगारांनी पालिका अधिकार्‍यांच्या सल्ल्यानुसार पोलीस स्थानकात धाव घेतली व तक्रार नोंदवली. पसार झालेला भाजीविक्रेता संध्याकाळ पर्यंत पोलिसांच्या हाती लागला नव्हता.  

दरम्यान, या घटनेनंतर पालिका सफाई कामगारांनी कचरा संकलनाचे काम खंडित केले व सर्व कामगार पोलीस स्थानकात जमा झाले. पोलिसांत तक्रार गुदरल्यावर काही कामगारांच्या सहाय्याने हे काम पुन्हा सुरू करण्यात आले. तसेच पालिका अधिकार्‍यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर दुपारनंतर कचरा संकलनाचे कामकाज पुर्वरत सुरू झाले.

हेही वाचा