सासष्टी : यशासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज : मंत्री गावडे

मडगावात ‘कलारंग’ कार्यक्रमाची सुरुवात : अभिनेत्री अलका कुबल यांची उपस्थिती

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
9 hours ago
सासष्टी : यशासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज : मंत्री गावडे

कलारंग कार्यक्रमाचे उद्घाटन करताना मंत्री गोविंद गावडे, अलका कुबल, आमदार दिगंबर कामत व इतर.

मडगाव : हिर्‍याला किंमत उगाच येत नाही, जमिनीखाली दबावाखाली राहावे लागते, त्यानंतर त्याला घाव सोसावे लागतात, त्यावेळीच त्याची गुणवत्ता वाढते व त्याला किंमत प्राप्त होते. कला क्षेत्रात यशासाठी यशस्वी कलाकारांचा आदर्श घ्यावा. यश झटपट मिळत नाही, त्यासाठी अथक प्रयत्न सातत्याने करावे लागतात, असे प्रतिपादन कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
मडगाव रवींद्र भवन येथे कला व संस्कृती संचालनालय व रवींद्र भवन यांच्या संयुक्त विद्यमाने कलांगण संस्थेतर्फे या नारी शक्तीला समर्पित ‘कलारंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, आमदार दिगंबर कामत, अभिनेत्री अलका कुबल, वर्षा उसगावकर, गायिका हेमा सरदेसाई, वालुशा डिसोझा, कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर उपस्थित यशस्वी महिला कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले की, युवावर्गाने यशस्वी व्यक्तींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रोत्साहन घेण्याची गरज आहे. मुलांवर संस्कार होण्याची गरज आहे. त्यासाठी संगीत, नृत्य, नाटक अशा कला क्षेत्रात शिकणार्‍या मुलांनी यशस्वी कलाकारांकडून आदर्श घ्यावे. तिसरीत असताना अलका कुबल यांनी कलाक्षेत्रात आल्या व माहेरची साडी चित्रपट केला त्यावेळी त्या २१ वर्षांच्या होत्या. मनुष्यातील कलाबीजांना प्रोत्साहन मिळाल्याशिवाय यश मिळणे शक्य नसते.
राज्य सरकारकडून विविध कलायोजना आणलेल्या आहेत. विविध संस्था कला क्षेत्रात काम करतात, त्यांच्याकडूनही कला पुढे नेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. व्यासपीठ उपलब्ध केले जात आहे. पण मुलांना झटपट यश मिळण्याची अपेक्षा असते. मात्र यश मिळवण्यासाठी सातत्याने कलेची साधना करावी लागते. राजकीय नेते निवडणुकीला सामोरे जातात, त्यावेळी त्यांचे पद हे ‘माजी’ होते. पण कलाकार हा नेहमी कलाकारच राहतो, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.
आमदार कामत यांनी सांगितले की, कलांगण संस्थेतर्फे कलारंग हा कार्यक्रम गेल्या २२ वर्षांपासून सलगपणे सुरू आहे. कुठल्याही उपक्रमात सातत्य राखणे हे गरजेचे असते.

गोव्याच्या मातीला परमेश्वराचा आशीर्वाद : कुबल
परमेश्वराने गोव्याच्या मातीला आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कलारत्ने उपजतात. वर्षा उसगावकर यांचा मराठी बिग बॉसमधील वावर पाहून खूप बरे वाटले. चित्रपट क्षेत्रात अनेक व्यक्ती एकमेकांशी कनेक्ट होत नाहीत, पण काही व्यक्ती या जीवनभर एकमेकांशी जोडल्या जातात. गायन, नृत्य, नाटक असा महोत्सव वर्षानुवर्षे सुरू राहो, असे अभिनेत्री अलका कुबल यांनी सांगितले.

हेही वाचा