फोंडा : बहिणीने दोघांना वाचवले पण भाऊ मात्र बुडाला; तिस्क-उसगावमधील घटनेला दुर्दैवी किनार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th October, 01:58 pm
फोंडा : बहिणीने दोघांना वाचवले पण भाऊ मात्र बुडाला; तिस्क-उसगावमधील घटनेला दुर्दैवी किनार

पणजी : काल बुधवारी सायंकाळी साईनगर, तिस्क-उसगाव येथील ओहोळात वाहून गेलेल्या दर्शन नार्वेकर (११) या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आज अग्निशमन दलाच्या हाती लागला. 

राज्यात परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उसगावातील ओहोळाला पूर आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन नार्वेकर हा विद्यार्थी अन्य ४-५ विद्यार्थ्यांसह सायंकाळी उशिरा शिकवणीहून घरी परतत होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली. यावेळी पावसाच्या पाण्यामुळे तुडुंब भरलेल्या ओहोळाचे पाणी रस्त्यावर आले होते. येथून जात असताना दर्शन व त्याच्या मित्रांना पाण्याचा अंदाज आला नाही व ते पाण्यात पडले.


दरम्यान दर्शनच्या बहिणीने प्रसंगावधान राखत दोघा मुलांना पाण्यातून बाहेर काढले मात्र दर्शन काही हाती लागला नाही. अग्निशमन दलाने रात्री उशीरापर्यंत शोध मोहीम सुरूच ठेवली होती. दरम्यान आज शोधकार्य पुन्हा सुरू झाले. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेला त्याचा मृतदेह सकाळी ११च्या सुमारास  एमआरएफ कंपनी जवळ सापडला. अवघ्या ११ वर्षांच्या दर्शनच्या अशा जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.  

बातमी अपडेट होत आहे.

हेही वाचा