महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण; संशयिताला झारखंड येथून अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 hours ago
महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण; संशयिताला झारखंड येथून अटक

पणजी : बार्देश तालुक्यात एका ३४ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. याशिवाय संशयिताने तिच्याशी लग्न केल्याचे भासवून तिची फसवणूक केल्याचा गुन्हा महिला पोलिसात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला पोलिसांनी संशयित २८ वर्षीय युवकाला झारखंड येथून अटक केली आहे. त्याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली आहे.

महिला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पीडित महिलेने सप्टेंबर २०२४ मध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित २८ वर्षीय युवकाने तिच्याशी मैत्री करून २०२१ ते २५ ऑगस्ट २०२४ दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. तसेच तिच्याशी लग्न केल्याचे भासवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी महिला पोलीस निरीक्षक रिमा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुवर्णा ताळगावकर यांनी संशयित युवकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, ८१, ८३ आणि ११८(१) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान संशयित झारखंड येथे मूळ गावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, निरीक्षक रिमा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रुपाली गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली पथक झारखंड येथे रवाना करण्यात आले. त्यानंतर पथकाने २८ वर्षीय युवकाला ताब्यात घेऊन गोव्यात आणले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. संशयिताला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली आहे.