सासष्टी : 'त्या' वादग्रस्त गाण्यामुळे रॅपर 'बाब अवी ब्रागांझा'विरोधात केला पोलिसांनी गुन्हा नोंद

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th October, 03:05 pm
सासष्टी : 'त्या' वादग्रस्त गाण्यामुळे रॅपर 'बाब अवी ब्रागांझा'विरोधात केला पोलिसांनी गुन्हा नोंद

पणजी : सुभाष वेलिंगकरांच्या 'त्या' विधानाने समाजात निर्माण झालेली तेढ आता रुंदावत चालली असून, दर दिवशी समाजकंटकांकडून या वादाच्या आगीत तेल ओतले जात आहे. आता मस्कत-ओमान स्थित मूळ माजोर्डा येथील गोमंतकीय रॅपर 'बाब अवी ब्रागांझा' याच्या विरोधात गोवा पोलिसांनी हिंदू भाविकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 


कोण आहे 'बाब अवी ब्रागांझा' ? 

मनीके मागे हीते या प्रसिद्ध श्रीलंकन पॉप गायीका योहानीच्या प्रचंड गाजलेल्या गीतावर कोकणी व हिंदी रॅप तयार करत 'बाब अवी ब्रागांझा' प्रकाश झोतात आला होता. गोवन पॉप सर्कलमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मात्र आता ब्रागांझाने सर्व मर्यादा ओलांडून अश्लाघ्य भाषा वापरुन तसेच अत्यंत हिंसक भाषेचा वापर करत निर्माण केलेल्या नवीन रॅपने समाज माध्यमांवर गदारोळ माजवला आहे. यात ब्रागांझावर समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवण्यासह, पंतप्रधान मोदींविरोधात हिंसात्मक टिप्पणी केल्याचा आरोप आहे.  ब्रागांझा याने X वर हिंदू संत, देवी देवता यांच्यावरही या  रॅपच्या माध्यमातून  अश्लाघ्य टिप्पणी केली होती

.

गोवा पोलिसांनी सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या या व्हिडिओची गंभीर दखल घेतली आहे. अनेकांनी या व्हिडिओबाबत पोलिसांत तक्रार दाखल केल्याने पोलिसांना याबाबत कारवाई करणे भाग पडले आहे. अवि ब्रागांझा हा मुळ माजोर्डा येथील युवक असून तो विदेशात रॅप तसेच पॉपचे कार्यक्रम करतो. एकूणच जनतेने समाज माध्यमांद्वारे पोलिसांना टॅग करत यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. याच आधारे पोलिसांनी 'बाब अवी ब्रागांझा' विरोधात समाजात तेढ निर्माण केल्या प्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवलेला आहे.    


दरम्यान, सुभाष वेलिंकरांनी सेंट झेवियरच्या शवाच्या डीएनए संदर्भात वक्तव्य केल्यानंतर राज्यातील ख्रिस्ती धर्मीय तसेच इतर धर्मातील लोकांनी यावर आक्षेप घेत निदर्शने केले होती. शांततापूर्ण आंदोलनाने दुसऱ्या दिवशी हिंसक वळण घेतले. यात एकास मारहाण देखील झाली. वेलिंकरांच्या अटके संदर्भात अनेक पोलीस स्थानकांत निवेदने देखील देण्यात आली. प्रकरण न्यायालयात पोहोचले. दरम्यान वेलिंगकरांनी चौकशीत पोलिसांना सहकार्य केल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने सदर याचिका निकाली काढली.