बेळगावात व्यावसायिकाच्या खुनाचा संशय

मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दफन केलेला मृतदेह उकरून काढला

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
16th October, 07:56 pm
बेळगावात व्यावसायिकाच्या खुनाचा संशय

बेळगाव : कारवार येथील व्यावसायिक विनायक नाईक यांच्या हत्येला काही दिवस उलटतात तोच बेळगावमध्ये एका व्यावसायिकाच्या हत्येचा प्रकार समोर आला आहे. नैसर्गिक मृत्यू आहे असे भासवून दफन केलेला त्या व्यावसायिकाचा मृतदेह त्याच्या मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर उकरून काढण्यात आला आहे. 

धक्कादायक म्हणजे त्या मुलीने आपल्या आईवर संशयाची सुई वळवली आहे. दरम्यान तोंडावर उशी ठेवून श्वास गुदमरवून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच मृत्यू झाला त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची दाट शक्यता आहे. 

पोलीसांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार बेळगाव शहरातील नामांकित व्यावसायिक संतोष पद्मन्नवर (वय ४८, रा. महांतेशनगर-अंजनेयनगर, सेक्टर क्रमांक १२) यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्यांचा खून झाल्याची तक्रार त्यांच्या मुलीने मंगळवारी माळमारुती पोलिसांत दिली होती. 

त्यानुसार माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन दफन केलेला मृतदेह बाहेर काढून बुधवारी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणात संतोष यांच्या मुलीने आपल्या आईवरच संशय व्यक्त केला आहे. 

संतोष पद्मन्नवर हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत महांतेशनगर, अंजनेयनगर परिसरात राहात होते. त्यांना पत्नी व तीन मुले असून मोठी मुलगी बंगळूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेते.  उर्वरित दोन्ही मुले १३ व १५ वर्षांची आहेत. ९ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे जाहीर करून त्याच दिवशी सदाशिवनगर येथील लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्या दफनविधीचे सोपस्कार पार पडले होते. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित व्यक्तीच्या तोंडावर उशी ठेवून श्वास गुदमरवून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच याप्रकरणी संशय बळावला आहे

खासगी सावकारीचा व्यवसाय
संतोष दुंडाप्पा पद्मन्नवर हे खासगी सावकारी करत होते. त्यांना वाहनांचीही आवड होती. वेगवेगळ्या संघटनांच्या कामात ते सक्रिय असायचे. गेल्या बुधवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र नेमक्या कोणत्या कारणामुळे ते दगावले याचा उलगडा झाला नाही.

नेत्रदानानंतर अंत्यविधी
संतोष यांनी आपल्या मृत्यूनंतर नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार खासगी इस्पितळात नेत्रदान करण्यात आले. नेत्रदानाच्या प्रक्रियेनंतर अंत्यविधी उरकण्यात आला असून एकंदर प्रकरणाबद्दल संशय बळावल्याने त्यांच्या मुलीने फिर्याद दिली होती. 

हेही वाचा