गोवा : कुलगुरूंना घेराव घातल्यानंतर विद्यापीठातील नोकरभरती स्थगित

गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांसह विचारला जाब

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
9 hours ago
गोवा : कुलगुरूंना घेराव घातल्यानंतर विद्यापीठातील नोकरभरती स्थगित

कुलगुरू हरिलाल मेनन यांना जाब विचारताना गोवा फॉरवर्ड पार्टीचे सरचिटणीस प्रशांत नाईक व इतर.

पणजी :
गोवा फॉरवर्ड पार्टीचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी गुरुवारी पक्षाच्‍या अन्‍य नेत्यांच्या शिष्टमंडळासह गोवा विद्यापीठाच्या नोकर भरती संदर्भात १५ वर्षांच्‍या गोव्‍यातील अधिवासाची अट शिथिल करणारी जाहिरात जारी केल्‍याबद्दल कुलगुरू हरिलाल मेनन यांना घेराव घालून जाब विचारला. गोवा फॉरवर्डच्‍या आणि विद्यार्थ्यांच्‍या मागणीवरून कुलगुरूंनी नियोजित पदांसाठीच्‍या मुलाखती थांबविण्‍याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई, उत्तर गोवा जिल्‍हाध्यक्ष दीपक कलंगुटकर, सरचिटणीस संतोषकुमार सावंत, पर्यावरण विभागाचे संयोजक विकास भगत आणि कार्यकारी सदस्य कादर शाह, फ्रेडी त्रावासो यांच्‍यासह विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांचाही समावेश होता.
गोवा विद्यापीठाने दाेन जागा भरण्‍यासाठी २३ ऑगस्‍ट २०२३ रोजी जाहिरात दिली होती. त्‍यातील एक जागा इतर मागासवर्गीय, तर दुसरी जागा सर्वसाधारण विभागासाठी होती. या संदर्भात उमेदवारांच्‍या मुलाखतीही घेतल्‍या होत्‍या, पण निवड केली नव्‍हती. २ ऑगस्‍ट २०२४ रोजी पुन्‍हा जाहिरात करुन इतर मागासवर्गीय आणि अनुसूचित जातींसाठी राखीव असलेली पदे रद्द करण्‍यात आली. एवढेच नव्‍हे, तर यासाठी जी १५ वर्षांच्‍या राज्‍यातील अधिवासाची अट रद्द करण्‍यात आली.
या गोष्‍टीला आक्षेप घेताना, या पदांसाठी पात्र गोमंतकीय उमेदवार असताना, कुलगुरू बाहेरील लोकांना या जागेवर आणण्याचा विचार का करत आहेत, असा सवाल प्रशांत नाईक यांनी केला. या पदासाठी पात्र गोमंतकीय उमेदवारांनी मुलाखतीही दिल्या होत्या. या उमेदवारांना हाकलून लावण्‍यासाठीच कुलगुरूंनी या मुलाखती घेतल्‍या हाेत्‍या का, असा सवाल त्‍यांनी केला.
या विषयावर पुढील चर्चा करण्‍यासाठी गोवा फॉरवर्डच्‍या चार सदस्‍यांचे शिष्‍टमंडळ कुलगुरूंना भेटणार आहे. गोव्‍यातील उमेदवारांना न्‍याय मिळवून देईपर्यंत गोवा फॉरवर्ड स्‍वस्‍थ बसणार नाही, असे नाईक यांनी सांगितले.

हेही वाचा