रणजी ट्रॉफी : गतविजेत्या मुंबईचे बडोद्यासमोर लोटांगण

पहिल्यास सामन्यात मुंबईचा ८४ धावांनी पराभव : भार्गव भट्ट सामनावीर

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
15th October, 12:25 am
रणजी ट्रॉफी : गतविजेत्या मुंबईचे बडोद्यासमोर लोटांगण

बडोदा : रणजी ट्रॉफी २०२४-२५ मध्ये मुंबईची सुरुवात खराब झाली. आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबईच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखालील बडोदा संघाने मुंबईला ८४ धावांनी मात दिली. बडोदाने मुंबईसमोर २६२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईचा संघ १७७ धावांवर गारद झाला. भार्गव भट्ट बडोद्याच्या विजयाचा शिल्पकार ठरला, त्याने सामन्यात १० गडी बाद केले.
रणजी ट्रॉफी २०२४-२५ चा हंगाम ११ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. पहिल्या फेरीत १६ सामने खेळले गेले. यात मुंबईचा पहिला सामना बडोद्याविरुद्ध झाला. वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बडोद्याने २९० धावा केल्या. मुंबईच्या तनुष कोटियनने ४ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा पहिला डाव २१४ धावांवर आटोपला. एकाही मुंबईकर खेळाडूला मोठी धावसंख्या करता आली नाही. फिरकीपटू भार्गव भट्टने ४ विकेट घेतल्या. अशाप्रकारे बडोदा संघाला पहिल्या डावात ७६ धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात त्यांना १८५ धावाच करता आल्या. मुंबईच्या तनुष कोटियनने ५ विकेट घेतल्या. पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर बडोद्याने मुंबईला २६२ धावांचे विजयी लक्ष्य दिले. गतविजेत्या मुंबई संघासाठी विजयाचे लक्ष्य कमी होते. संघातील दिग्गज खेळाडू अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर हे विजय खेचून आणतील, असा विश्वास होता. मात्र, खेळपट्टी खराब झाली होती. अशा खेळपट्टीवर २६२ धावांचे लक्ष्य अजिबात सोपे नव्हते. श्रेयस अय्यर ३० धावा करून बाद झाला तर रहाणे आणि पृथ्वी शॉ १२-१२ धावा करून माघारी परतले. मुंबईने १३७ धावांत ८ विकेट गमावल्या. अशावेळी सिद्धार्थ लाडने (५९) मुंबईसाठी एकाकी झुंज दिली. मात्र, त्याची खेळी संघाचा पराभव टाळू शकली नाही. मुंबईचा संघ १७७ धावांवर सर्वबाद झाला.
बडोद्याचा भार्गव भट्ट विजयाचा नायक
भार्गव भट्ट बडोद्याच्या विजयाचा नायक होता. दोन्ही डावात १० बळी घेऊन हा डावखुरा फिरकीपटू सामनावीर ठरला. दुसऱ्या डावात त्याने ६ बळी घेतले. दुसऱ्या डावात त्याने कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि सिद्धेश लाड यांच्या महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. तर भार्गव भट्टने पहिल्या डावात ४ गडी बाद केले होते.
........
गोव्यासह, हरियाणा, सिक्कीमचीही विजयी सुरुवात
गोवा, हरियाणा, रेल्वे, तामिळनाडू आणि सिक्कीम यांनी रणजी ट्रॉफी २०२४-२५ मध्ये विजयाने सुरुवात केली आहे. पहिला सामना गोव्याने मोठ्या फरकाने जिंकला. गोव्याने मणिपूरचा ९ गडी राखून पराभव केला. तर हरियाणाने बिहारचा एक डाव आणि ४३ धावांनी पराभव केला. रेल्वेने चंदीगडचा १८१ धावांनी पराभव केला. तमिळनाडूनेही सौराष्ट्रचा एक डाव आणि ६५ धावांनी पराभव केला. नागालँडने अरुणाचल प्रदेशचा एक डाव आणि २९० धावांनी पराभव केला. तर सिक्कीमने मिझोरामचा १३७ धावांनी पराभव करत आपले खाते उघडले.

हेही वाचा