सलग चौथ्या विजयासह ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

हरमनप्रीतची अर्धशतकी खेळी व्यर्थ, भारत ९ धावांनी पराभूत

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
14th October, 12:40 am
सलग चौथ्या विजयासह ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

शारजा : महिला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महत्त्वाचा सामना पार पडला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताचा ९ धावांनी पराभव केला. या विजयासह त्यांनी महिला टी-२० विश्वचषक २०२४च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरी गाठण्याच्या दृष्टिकोनातून हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा होता. टीम इंडिया अजूनही शर्यतीत आहे, पण उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघावर अवलंबून राहावे लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना १५१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला २० षटकांत ९ बाद केवळ १४२ धावा करता आल्या. भारताकडून हरमनप्रीत कौरने नाबाद अर्धशतक झळकावले. तिने ४७ चेंंडूत ६ चौकाराच्या मदतीने ५४ धावा केल्या. मात्र, तरीही टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही. हरमनप्रीत कौरने ४४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तिचे हे टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १४ वे अर्धशतक ठरले. आॅस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत अॅनाबेल सदरलँड आणि सोफी मोलिनेक्सने प्रत्येकी दोन गडी बाद करून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तर मेगन शुट्ट आणि एशले गार्डनर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
याव्यतिरिक्त भारताकडून फलंदाजीत दीप्ती शर्मा २५ चेंडूत तीन चौकारासह २९ धावा करून तर शेफाली वर्मा १३ चेंडूत (२ चौकार आणि १ षटकार) २० धावा करून बाद झाली. जेमिमाह रॉड्रिग्ज १२ चेंडूत तीन चौकारासह १६ धावा करून बाद झाली. याव्यतिरिक्त पूजा वस्त्राकर ९, स्मृती मानधना ६ धावा, ऋचा घोष १ धाव काढून तर अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील आणि राधा यादव शून्यावर बाद झाल्या.
तत्पूर्वी, महत्त्वपूर्ण लढतीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ८ गडी गमावून १५१ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीत ग्रेस हॅरिसने ४१ चेंडूत ५ चौकारासह ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कर्णधार ताहलिया मॅकग्राने २६ चेंडूत ४ चौकारासह ३२ धावांची, तर एलिस पेरीने २३ चेंडूत २ चौकार अन् एका षटकाराच्या मदतीने ३२ धावांचे योगदान दिले.
भारताकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्मा आणि रेणुका सिंगने प्रत्येकी २ बळी घेतले. दीप्तीने ४ षटकात २८, तर रेणूकाने ४ षटकात २४ धावा दिल्या. श्रेण्यका पाटील (४ षटकांत ३२ धावा), पूजा वस्त्राकर (३ षटकांत २२ धावा) आणि राधा यादव (२ षटकांत १४ धावा) यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीसह ए ग्रुपमध्ये अव्वल
हा सामना चालू असतानाच ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला होता. कारण भारताला विजयासाठी झुंजायला लावल्याने त्यांचा नेट रन रेट चांगला राहिला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दोन संघातील स्थान निश्चित केले होते. अखेर भारताविरुद्ध विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने ए ग्रुपमध्ये अव्वल स्थानही निश्चित केले.


ऑस्ट्रेलियाचे अखेरचे षटक रोमांचक
अखेरच्या षटकात भारताला १४ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर हरमनप्रीतने एक धाव घेतली. मात्र पुढच्याच चेंडूवर ऍनाबेल सदरलँडने पूजा वस्त्राकरला ९ धावांवर त्रिफळाचित केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर अरुंधती रेड्डी धावबाद झाली. चौथ्या चेंडूवरही हरमनप्रीतला मोठा फटका मारता आला नाही. या चेंडूवरही एकच धाव निघाली.
अखेरच्या दोन चेंडूत १२ धावांची गरज असताना सदरलँडने वाईड चेंडू टाकला. पण त्यावेळी धाव घेण्याचा गोंधळात श्रेयंका पाटील धावबाद झाली. भारताने पाचव्या चेंडूवरही नववी विकेट गमावली. राधा यादव पायचित झाली आणि ऑस्ट्रेलियाचा विजय देखील निश्चित झाला. अखेरच्या चेंडूवर रेणुका सिंगने एक धाव घेतली. अखेरीस हरमनप्रीत ४७ चेंडूत ५४ धावांवर नाबाद राहिली.

..........
संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ८ बाद १५१ धावा.
भारत : २० षटकांत ९ बाद १४२ धावा.
सामनावीर : सोफी मोलिनेक्स

हेही वाचा