टीम इंडियाचे बांगलादेशाविरुद्ध ‘सीमोल्लंघन’

दसऱ्या दिवशीच ३-0 ने केला मालिकेवर कब्जा : संजू सॅमसनचे वादळी शतक, सूर्याचे अर्धशतक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
13th October, 12:31 am
टीम इंडियाचे बांगलादेशाविरुद्ध ‘सीमोल्लंघन’

हैदराबाद : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखआली भारताने दसऱ्याच्या दिवशी विजयाचे तोरण बांधले. भारताने तिसऱ्या सामन्यात दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने टी २० मालिकेत बांगलादेशवर ३-० असे निर्भेळ यश मिळवले. संजू सॅमसनचे तुफानी शतक आणि त्याला सूर्याच्या मिळालेल्या झंझावाती साथीच्या जोराावर भारताने आपल्या स्वत:चाच विक्रम यावेळी मोडीत काढला.
भारताने या सामन्यात २९७ धावांचा डोंगर उभारला आणि विजयाचा पाया रचला. बांगलादेशला हे आव्हान पेलवले नाही आणि भारताने त्यांच्यावर १३३ धावांनी मोठा विजय साकारला. या विजयासह भारताचा हा दुसरा टी २० मालिका विजय ठरला आहे.
या सामन्यात टीम इंडियाने २० षटकात ६ गडी गमावून २९७ धावा केल्या. या धावंसख्येच्या जोरावर टीम इंडियाने मोठा पराक्रम केला आहे. पूर्ण सदस्य राष्ट्रातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानचा रेकॉर्ड मोडला आहे. अफगाणिस्तानने २०१९ मध्ये आयर्लंडविरुद्ध २७८ धावा केल्या होत्या. संजू सॅमसनच्या शानदार खेळीमुळे भारताने या सामन्यात एवढी मोठी धावसंख्या उभारली. त्याने ४७ चेंडूत १११ धावांची तुफानी खेळी साकारली.
२०२३ मध्ये मंगोलियाविरुद्ध ३१४ धावा करणाऱ्या नेपाळच्या नावावर टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आहे. त्यामुळे आता क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्येची नोंद टीम इंडियाच्या नावावर झाली आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यापूर्वी, चेक प्रजासत्ताक या यादीत दुसऱ्या स्थानावर होता, ज्याने २०१९ मध्ये तुर्कीविरुद्धच्या सामन्यात २७८ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. आता हा विक्रम टीम इंडियाने मागे टाकला आहे.
दरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवने ३१ धावा पूर्ण करत रोहित शर्माला मागे टाकत एक मोठा पराक्रम केला. सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५०० धावांचा टप्पा गाठला आहे. सूर्याने रोहित शर्माचा टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वात जलद २५०० धावा करण्याचा विक्रमही मोडला आहे. ही कामगिरी करणारा सूर्या भारताचा दुसरा तर जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. सूर्याने केवळ ७१व्या डावात हा टप्पा गाठला तर रोहितने २५०० धावा पूर्ण करण्यासाठी ९२ डाव घेतले होते.
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने गेल्या अनेक वर्षांची भरपाई एकाच सामन्यात केली. संजूने बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी २० सामन्यात स्फोटक आणि विक्रमी शतक केले.
संजूने आधी अवघ्या २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर संजूने पुढील १८ चेंडूत शतक पूर्ण केले. संजूच्या टी २० कारकीर्दीतील हे पहिलेवहिले शतक ठरले. संजूने यासह कर्णधार सूर्यकुमार यादव याचा रेकॉर्ड उद्धवस्त केला आहे. मात्र संजूची रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढण्याची संधी थोडक्यात हुकली.
संजूने सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर संजूने एकाच षटकातमध्ये ५ षटकार ठोकले. संजूने टॉप गिअरमध्ये बॅटिंग सुरुच ठेवत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. संजूने १३ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून टी २० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. संजूने २५० च्या स्ट्राईक रेटने ८ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केले.
संजू यासह टीम इंडियाकडून टी २० मध्ये वेगवान शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. संजूने याबाबतीत सूर्यकुमार यादव याला मागे टाकले. टीम इंडियाकडून वेगवान शतक करण्याचा विक्रम हा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर आहेटी २० क्रिकेटमध्ये वेगवान शतकाचा विश्व विक्रम हा साहिल चौहान याच्या नावावर आहे. साहिलने अवघ्या २७ चेंडूत १७ जून २०२४ रोजी हा कारनामा केला होता. तर टीम इंडियाकडून रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्ध इंदूर येथे ३५ चेंडूमध्ये सेंच्युरी केली होती. तर सूर्याने राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्धच ४५ चेंडूतमध्ये शतक पूर्ण केले होते.
टी-२० मध्ये जलद २५०० धावा पूर्ण करणारे फलंदाज
बाबर आझम- ६२
मोहम्मद रिझवान- ६५
विराट कोहली- ६८
सूर्यकुमार यादव- ७१
टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवणारे देश
३१४/३ – नेपाळ विरुद्ध मंगोलिया, हांगझोऊ, २०२३
२९७/६ – भारत विरुद्ध बांगलादेश, हैदराबाद, २०२४
२७८/३ – अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड, डेहराडून, २०१९
२७८/४ – झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्की, इल्फोव्ह काउंटी, २०१९
२६८/४ – मलेशिया विरुद्ध थायलंड, हांगझोऊ, २०२३
२६७/३ – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज, तारौबा, २०२३
भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारे फलंदाज
३५ : रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, २०१७
४० : संजू सॅमसन विरुद्ध बांगलादेश, २०२४
४५ सूर्यकुमार यादव विरुद्ध श्रीलंका, २०२३
४६ : केएल राहुल विरुद्ध वेस्ट इंडिज, २०१६
४६ : अभिषेक शर्मा विरुद्ध झिम्बाब्वे, २०२४                  

हेही वाचा