केपे, पर्वरीत अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

केप्यात संतप्त नागरिकांची पोलिसांवर सरबत्ती; पर्वरीत ट्रक चालकाला अटक


11 hours ago
केपे, पर्वरीत अपघात; दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

केपे येथील दुचाकींना धडक दिल्यानंतर रस्त्याच्या बाजूला जाऊन थांबलेली अपघातग्रस्त कार.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा/केपे : केपे आणि पर्वरी येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. केपे येथे रविवारी रात्री उशिरा भरधाव वेगातील कारने तीन दुचाकींना ठोकर दिली. यात दुचाकीवर बसलेला तरुण जागीच मृत्यू पावला, तर एक गंभीर जखमी झाला. सोमवारी सकाळी संतप्त नागरिकांनी आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्यासह पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली. पर्वरीत सोमवारी सकाळी ट्रकने दुचाकीला पाठीमागून धक्का दिल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेली महिला ट्रकखाली आल्यामुळे ठार झाली, तर दुचाकीचालक जखमी झाला. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
केपे येथे भरधाव कारची तीन दुचाकींना धडक
देवळमळ केपे येथे रविवारी रात्री १०.४५ दरम्यान भरधाव स्कोडा कारने रस्त्याच्या बाजुला दुचाकी उभी करून बोलत थांबलेल्या तीन तरुणांना धडक दिली. यात दोघे युवक कारखाली येऊन ३० मीटरपर्यंत फरफटत गेले. यात अब्दुल कादर बादशाह (२६) याचा जागीच मृत्यू झाला, तर सोफीयन शेख (२४) गंभीर जखमी झाला. त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत पावलेल्या अब्दुलच्या पश्चात पत्नी व आठ महिन्यांचे बाळ आहे.
अपघातामुळे संतप्त झालेल्या १००हून अधिक नागरिकांनी सोमवारी सकाळी पोलीस स्थानक गाठले. त्यांच्यासोबत आमदार एल्टन डिकॉस्टा आणि नगरसेवक दयेश नाईक, प्रसाद फळदेसाई, गणपत मोडक होते. त्यांनी केपेचे पोलीस निरीक्षक अर्जुन सांगोडकर यांची भेट घेऊन चर्चा केली. अपघातग्रस्त कारमध्ये गांजा सापडला. कार एका पोलिसाने घाईगडबडीत घटनास्थळावरून क्रेनच्या साहाय्याने हलवली. पंचनामा योग्य पद्धतीने झालेला नाही, असे आरोप करून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षकांनी कारवाईचे आश्वासन दिले. न्याय मिळाला नाही तर पोलीस स्थानकावर मोर्चा काढू, अशा इशारा प्रसाद फळदेसाई यांनी दिला.
अपघाताची घटना दुःखद आहे. पोलीस निरीक्षकांशी चर्चा केली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अपघातग्रस्त कारमध्ये ड्रग्ज आढळल्याने ड्रग्ज केप्यापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट होते. पोलिसांनी याबाबतही चौकशी करून कारवाई करावी.
_ एल्टन डिकॉस्टा, आमदार, केपे
पर्वरी अपघातास कारणीभूत ट्रकचालकावर गुन्हा दाखल
पर्वरी येथील नवरत्न रेस्टॉरंटसमोर सोमवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातग्रस्त ट्रक (क्र. जीए ०५ टी ७९७९) आणि अॅक्सेस स्कूटर (क्र. जीए ०७ व्ही ५२०५) पणजीहून म्हापसाच्या दिशेने जात होते. धडक बसल्यानंतर दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या विजया मुरगावकर (४५, रा. सिरीन-चिंबल) रस्त्यावर पडल्या. त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले. गंभीर जखमी झालेल्या विजया यांना ताबडतोब रुग्णवाहिकेतून गोमेकॉत नेण्यात आले; मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातात दुचाकीस्वार हिरालाल मुरगावकर (५५) हे किरकोळ जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक अरुण शिरोडकर व हवालदार विशाल गावस यांनी पंचनामा केला. पोलिसांनी ट्रक चालक मोहम्मद अफजल अन्सारी याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.