दिल्लीत सीआरपीएफ शाळेजवळ स्फोट

दुकाने, गाड्यांचे नुकसान : पोलिसांकडून कसून तपास सुरू


21st October, 12:20 am
दिल्लीत सीआरपीएफ शाळेजवळ स्फोट

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी सेक्टर येथे रविवारी सकाळी ७.३० च्या सुमारास सीआरपीएफ शाळेजवळ स्फोट झाला. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. शाळेची भिंत, जवळपासची दुकाने आणि काही गाड्यांचे नुकसान झाले. माहिती मिळताच बॉम्बनिकामी पथक, फॉरेन्सिक टीम, गुन्हे शाखा आणि विशेष कक्ष तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी तपासासाठी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी टीमच्या सूत्रांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात स्फोटात वापरलेली सामग्री क्रूड बॉम्बसारखी आहे, मात्र संपूर्ण अहवाल आल्यानंतरच अधिकृत माहिती उपलब्ध होईल.
दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी सतर्कता आणि तपास वाढवण्यासाठी जवळपासच्या पोलीस स्थानकांना अलर्ट जारी केला आहे. बाजारपेठांमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे. लोकांनी संशयास्पद वस्तू दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांची एटीएस या घटनेचा दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टिकोनातून तपास करत आहे. सणासुदीच्या काळात राजधानी दिल्लीत झालेल्या या स्फोटामागे दहशतवादी कट होता का, हा स्फोट म्हणजे एखाद्या कटाची तयारी होती का, तेही तपासले जात आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. सायंकाळी एनएसजीचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी सापडली संशयास्पद पांढरी पावडर
अग्निशमन दलाच्या पथकाने व एनसजी, दिल्ली पोलीस, फॉरे‌न्सिक तज्ज्ञांच्या पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. या शोधमोहिमेत त्यांना काही संशयास्पद वस्तू आढळल्या आहेत. तपास करणाऱ्या पथकाला घटनास्थळी पांढऱ्या रंगाची पावडर सापडली आहे. भिंतींवरही या पावडरचे कण सापडले आहेत. फॉरेन्सिक टीम या पावडरची तपासणी करत आहे. काही सूत्रांनी म्हटले की, गावठी स्फोटकांच्या मदतीने हा स्फोट घडवून आणला असावा.
आम्ही या स्फोटाचे कारण शोधत आहोत. यासाठी तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण केले आहे. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही या परिसरात पोलिसांची मोठी तुकडी तैनात केली आहे. तज्ज्ञांचे पथक तपासाअंती या प्रकरणाची माहिती देईल.
_ अमित गोयल, पोलीस उपायुक्त, रोहिणी