मुलाच्या खूनप्रकरणी तुरुंगात असलेल्या सूचना सेठला हवा मोबाईलचा ताबा

कंपनीतील सहकारी, व्यावसायिक लोकांशी संपर्क साधण्यासाठी हवा मोबाईल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st October, 06:14 am
मुलाच्या खूनप्रकरणी तुरुंगात असलेल्या सूचना सेठला हवा मोबाईलचा ताबा

पणजी : चार वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप असलेल्या बंगळूरू येथील आर्टिफिशिल इंटेलिजन्स कंपनीची संस्थापिका तथा सीईओ सूचना सेठ हिने तिच्या मोबाईल फोनची मागणी केली आहे. या संदर्भात सेठ हिने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ रोजी होणार आहे.
संशयित सूचना सेठ हिने ७ जानेवारी २०२४ रोजी रात्री सिकेरी- कांदोळी येथील हॉटेलमध्ये स्वत:च्या चार वर्षांच्या मुलाचा खून केला होता. त्यानंतर स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचाही प्रयत्न तिने केला. पण, त्यात ती अपयशी ठरली. त्यानंतर तिने मुलाचा मृतदेह बॅगमध्ये भरून गोव्यातून रस्त्यामार्गे बंगळूरला पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, कळंगुट पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती कर्नाटक पोलिसांच्या तावडीत सापडली. कर्नाटक पोलिसांनी तिला अटक करून गोवा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली होती. दरम्यान ती न्यायालयीन कोठडीत असताना बांबोळी येथील मानसोपचार संस्थेने (आयपीएचबी) तिची वैद्यकीय चाचणी केली होती. त्यात तिची मानसिक स्थिती उत्तम असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच ती मानसिक आजारी नसून तिने सद्बुद्धीत नियोजनबद्धरित्या मुलाचा खून केल्याचे त्यात निष्पन्न झाले होते. त्यानंतर या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी तपास पूर्ण करून बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. तिथे सुनावणी सुरू झाल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या ठीक नाही, असा दावा तिच्या वडिलांनी करून पुन्हा मानसिक चाचणी करण्यात यावी, असा अर्ज बाल न्यायालयात केला होता. त्यातही तिची मानसिक स्थिती उत्तम असल्याचा अहवाल वैद्यकीय मंडळाने दिला होता.
दरम्यान सेठ हिने अर्ज दाखल करून तिचा मोबाईल फोन परत करण्याची मागणी केली आहे. कंपनीतील सहकाऱ्याशी तसेच व्यावसायिक लोकांशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल हवा असल्याचे कारण दिले आहे. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर सेठ हिने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी सरकारी वकिलांनी बाजू मांडण्यासाठी एका आठवड्याची मुदत मागितली आहे. त्यानुसार या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ रोजी ठेवली आहे.